Libia Flood : इशाऱ्याकडे दुर्लक्ष! अन्यथा बहुतांश लोकांना वाचविता आले असते

‘डॅनिएल वादळाबाबत मध्य समुद्रानजीकच्या प्रत्येक देशाने आपल्या पुरता विचार केला.
Libia Flood
Libia FloodSakal

डेर्ना (लीबिया) - ‘डॅनिएल वादळाबाबत मध्य समुद्रानजीकच्या प्रत्येक देशाने आपल्या पुरता विचार केला. या वादळाच्या इशाऱ्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले असते, तर लीबियामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतांश जणांना वाचविता आले असते,’ असा दावा आज जागतिक हवामान संघटनेने केला.

सरकारी आकडेवारीनुसार लीबियामधील पूरबळींची संख्या ५,१०० च्या आसपास असली तरी सर्वाधिक फटका बसलेल्या डेर्ना शहराच्या महापौरांच्या मते १८ ते २० हजार जणांचा या पुरात मृत्यू झाला आहे.

लीबियामधील पुराबाबत आज जागतिक हवामान संघटनेचे सरचिटणीस पॅटरी तलास यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, ‘डॅनिएल वादळाने ग्रीसलाही तडाखा दिला होता. मात्र, मध्य समुद्राला जोडलेल्या प्रत्येक देशाने आपापल्या देशापुरता धोक्याचा इशारा दिला.

इतर ठिकाणच्या घडामोडींकडे लीबियामधील सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यांनी जनतेला सावधगिरीचा इशारा जारी करून त्यांचे तात्पुरते स्थलांतर केले असते तरी हजारो जणांचा जीव वाचविता आला असता.’ लीबियामध्ये राजकीय संघर्षाचे वातावरण असल्याने जनतेच्या हिताकडे दुर्लक्ष झाले, अशी टीकाही तलास यांनी केली.

विनाशकारी पूर

  • गाळ उपसून मृतदेह बाहेर काढण्याचे काम वेगाने सुरु

  • मृतदेह सडत असल्याने रोगराई पसरण्याचा इशारा

  • अद्यापही किमान १० हजार जण बेपत्ता

  • इजिप्त, ट्युनिशिया, इटली, स्पेन आणि तुर्कियेची बचाव पथके दाखल

संभ्रम निर्माण करणारे संदेश

वादळाने तडाखा दिल्यानंतर पूर्व लीबियामधील अनेक शहरांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या सूचना सरकारकडून दिल्या गेल्या होत्या. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या लीबियाच्या राजनैतिक अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लीबियातील बेंगझाई शहरातील लोकांना सरकारकडूनच ‘घरीच थांबा’ आणि ‘सुरक्षितस्थळी जा’ अशा सूचना मिळाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. असाच प्रकार डेर्नामध्येही झाला असण्याची शक्यता या अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.

एका दिवसात २६० पट पाऊस

लीबियामध्ये डॅनिएल वादळामुळे मागील आठवड्यात प्रचंड पाऊस कोसळला होता. किनारपट्टीच्या काही भागात २४ तासांत ४०० मिमी पाऊस कोसळला. येथील महिनाभराच्या सरासरीपेक्षाही हे प्रमाण २६० पट अधिक होते. डेर्ना शहराच्या जवळील दोन धरणे फुटल्याने मृतांची संख्या प्रचंड वाढली. डेर्ना शहरातून वाहणारी नदी बहुतांश काळ कोरडीच असते.

मात्र, असाधारण पाऊस कोसळल्याने नद्यांना पूर आले होते. धरणांमध्ये १५ लाख टन पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आहे. मात्र, धरणे भरल्याने आणि त्यातच टेकड्यांवरून येणारे पाणी वेगाने धरणात पडत असल्याने दबाव वाढून भिंती कोसळल्या आणि एकाच वेळी प्रचंड प्रमाणात पाणी वेगाने गावात शिरले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com