लीबियातून 7 भारतीयांचे अपहरण; मायदेशी परतण्यासाठी जात होते विमानतळाकडे

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 October 2020

लिबियामध्ये सात भारतीयांचे अपहरण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली आहे.

त्रिपोली - लिबियामध्ये सात भारतीयांचे अपहरण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली आहे. लिबियातील अशवरीफ इथून या सर्वांचे अपहरण झाल्याचं त्यांनी सांगितलं. एका कन्स्ट्रक्शन आणि ऑइल कंपनीत काम करत होते. भारतात परतण्यासाठी त्रिपोली विमानतळाकडे सर्वजण जात असताना त्यांचे अपहरण करण्यात आले. 

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2015 मध्ये भारत सरकारने देशातील नागरिकांना लिबियात जाणं टाळा असं सांगितलं होतं. लिबियात जाण्यासाठी 2016 मध्ये भारताने पूर्णपणे निर्बंध घातले होते. अद्याप हे निर्बंध कायम आहेत. लिबियातील परिस्थिती बाहेरील नागरिकांसाठी सुरक्षित नसल्याचं म्हटलं होतं. आता ज्या भारतीय नागरिकांचे अपहरण झाले आहे त्यामागे कोणाचा हात आहे याची माहिती देण्यात आलेली नाही. 

हे वाचा - दक्षिण चिनी समुद्रातील चीनच्या हालचालींवर नाटोचे लक्ष हवे

अपहरण झालेल्यांमध्ये आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील नागरिकांचा समावेश आहे. सध्या या प्रकरणात ट्युनिशियातील भारतीय दुतावास पाठपुरावा करत आहे. दुतावासाकडून लिबिया सरकार आणि आंतरराष्ट्रीय संघटनांशी सातत्याने संपर्क साधला जात आहे. भारत सरकारला अशीही माहिती मिळत आहे की, अपहरण झालेले सर्व नागरिक सुखरूप असून त्यांचे फोटोही दाखवण्यात आले आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, अपहरण झालेल्या सर्व लोकांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला आहे. तसंच अपहरण झालेल्यांची लवकर सुटका करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अपहरण करणाऱ्यांनी अपहरणग्रस्तांच्या कंपनीशी संपर्क साधला असल्याची माहिती मिळत आहे. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

भारतीयांच्या अपहरणाची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही लिबियामध्ये भारतीयांचे अपहरण झाले आहे. 2015 मध्ये चार भारतीयांचं अपहरण झालं होतं. त्यांच्या सुटकेसाठी बराच काळ लागला होता. अशाच पद्धतीने मोसुलमध्येही 39 भारतीयांचे अपहरण झाले होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: libya 7 indians abducted foreign ministry contact with families