कुचिभोतला हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेप

वृत्तसंस्था
रविवार, 6 मे 2018

न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे माझे पती परत येणार नाहीत, मात्र वर्णद्वेश खपवून घेतला जाणार नाही, हा संदेश या निकालातून जाईल. न्यायालय आणि पोलिस यंत्रणेला मी धन्यवाद देते.
- सुनयना दुमाला, श्रीनिवास कुचिभोतलाची पत्नी.

अमेरिकेतील कन्सासमधील न्यायालयाचा निर्णय

वॉशिंग्टन: भारतीय अभियंता श्रीनिवास कुचिभोतला याची वर्णद्वेशातून गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या आरोपीला अमेरिकेतील न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ऍडम प्युरिंटन (वय 52) असे या आरोपीचे नाव असून, तो अमेरिकी नौदलातून निवृत्त झाला आहे.

कन्सास येथील एका हॉटेलमध्ये मागील वर्षी ऍडम याने बंदुकीतून गोळ्या झाडत कुचिभोतला याची हत्या केली होती. या वेळी कुचिभोतला बरोबर असलेला त्याचा मित्र अलोक मदासनी हा जखमी झाला होता. तर ऍडमला रोखण्याचा प्रयत्न करणारा अमेरिकी नागरिक इयान ग्रिलोट हाही जखमी झाला होता.

"माझ्या देशातून चालते व्हा' असे ओरडत ऍडम याने कुचिभोतलावर गोळ्या झाडल्या होत्या. कुचिभोतला याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता. मूळचा हैदराबादचा असलेला कुचिभोतला हा गारमीन या प्रसिद्ध कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होता.

पॅरोलही नाकारला
कन्सास येथील न्यायालयाने ओरीप ऍडम याला सुमारे 78 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. वयाची शंभरी पूर्ण करेपर्यंत त्याला पॅरोल मंजूर करण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे. ऍडम याने गुन्हा कबूल केल्यानंतर त्याला मार्चमध्ये न्यायालयाने दोषी ठरविले होते. कुचिभोतला याची हत्या करणे आणि इतर दोघांच्या खुनाचा प्रयत्न करणे आदी आरोप त्याच्याविरोधात ठेवण्यात आले होते. वर्णद्वेशातून हल्ला केल्याचा आरोपही ऍडम याच्याविरोधात ठेवण्यात आला असून, त्यावर 21 मे रोजी सुनावणी होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Life imprisonment for Kuchibhotala murder case