लंडनमध्ये भीषण अग्नितांडव

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 जून 2017

लंडन - पश्‍चिम लंडनमधील "ग्रेनफेल टॉवर'ला बुधवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, सुमारे 74 जण जखमी झाले आहेत. आग लागली तेव्हा इमारतीमधील 120 फ्लॅटमध्ये सुमारे सहाशे जण होते. त्यापैकी अनेकांना वाचविण्यात यश आले असले, तरी मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. ब्रिटनच्या इतिहासातील तीन दशकांतील आगीमुळे झालेली ही सर्वांत भीषण घटना मानली जाते.

स्थानिक वेळेनुसार बुधवारी मध्यरात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाचे दोनशेहून अधिक कर्मचारी अटोकाट प्रयत्न करत आहेत; मात्र बुधवारी रात्री उशिरापर्यंत आग पूर्णपणे विझवण्यात यश आले नसल्याचे सांगण्यात आले. आगीत होरपळून सहा जणांचा मृत्यू झाला असून, मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. संपूर्ण इमारतच अवघ्या काही मिनिटांत आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे आग विझवण्यात प्रचंड अडचणी येत आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटविण्यासाठी अनेक दिवस लागू शकतात, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

अग्निशामक दलाचे तब्बल 40 बंब आणि 20 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. बुधवारी रात्री उशिरापर्यंत आग पूर्णपणे विझली नसल्यामुळे इमारत कोसळण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे "बीबीसी'च्या वृत्तात म्हटले आहे. जखमी झालेल्या 74 जणांवर उपचार सुरू असून, त्यापैकी 20 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. इमारतीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमधील बिघाड झालेल्या फ्रिजमुळे ही आग भडकल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशामक विभागाने वर्तवला आहे.

लहानग्यांचा आक्रोश
संपूर्ण इमारतीनेच पेट घेतल्यामुळे अनेक जण घरांच्या खिडक्‍यांमधून मदतीसाठी आक्रोश करतानाचे चित्र भयावह होते, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. लहान मुलांच्या किंकाळ्यांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्यांचा थरकाप उडाला. एका महिलेने नऊव्या किंवा दहाव्या मजल्यावरून आपल्या लहान मुलाला इमारतीच्या जवळ उभ्या असलेल्या गर्दीच्या दिशेने फेकले. त्या वेळी प्रसंगावधान राखून एका व्यक्तीने त्या मुलाला झेलले, तर दुसऱ्या एका व्यक्तीनेही आपल्या मुलाला गर्दीच्या दिशेने फेकल्यामुळे त्या मुलाचे प्राण वाचल्याचे सांगण्यात आले.

Web Title: london fire international news marathi news