महात्मा गांधींच्या चष्म्यासाठी लागली कोट्यवधींची बोली; वाचा रक्कम

वृत्तसंस्था
Saturday, 22 August 2020

ब्रिटनच्या ब्रिस्टॉल शहरात गांधीजींच्या चष्म्याचा ऑनलाइन लिलाव करण्यात आला.

लंडन: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा चष्मा अमेरिकेतील एका जिल्हाधिकाऱ्याने २ कोटी ५५ लाख रुपयास खरेदी केला. ब्रिटनच्या ब्रिस्टॉल शहरात गांधीजींच्या चष्म्याचा ऑनलाइन लिलाव करण्यात आला. हा लिलाव इस्ट ब्रिस्टॉल ऑक्शन्स संस्थेकडून आयोजित करण्यात आला होता. १९१०-३० या काळात दक्षिण आफ्रिकेत असताना महात्मा गांधी यांनी हा चष्मा घातला होता आणि त्यानंतर एका कुटुंबास भेट म्हणून दिला. या चष्म्यासाठी १० हजार ते १५ हजार पौंड (सुमारे ९.७७ ते १४.६६ लाख रुपये) बोली लागणे अपेक्षित होते. परंतु हा चष्मा दोन कोटी रुपयापेक्षा अधिक किंमतीस विकला गेला. अमेरिकेतील खरेदीदाराचे नाव गुप्त ठेवले आहे.

कोरोना महामारी केव्हा संपेल? जागतिक आरोग्य संघटनेने दिली माहिती

नैऋत्य ब्रिटनमधील उपनगर हनहम येथील कंपनी इस्ट ब्रिस्टॉल ऑक्शन्सने म्हटले की, या चष्म्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. परंतु विक्रेत्याने त्याची किंमत सांगितली नव्हती. ही वस्तू मौल्यवान नसेल तर ती नष्ट करा, असे त्याने सांगितल्याचे लिलावकर्ता ॲडी स्टोव्ह यांनी सांगितले. हा चष्मा ब्रिटनमधील एका अज्ञात कुटुंबाकडे होता. हा चष्मा त्यांच्याकडे कसा आला, याबाबत चष्मा विक्रेत्याने सांगितले की, त्याच्या काकाकडे हा चष्मा होता. हा चष्मा त्यांना महात्मा गांधी यांनी भेट म्हणून दिला होता. 

१९१०-३० या काळात दक्षिण आफ्रिकेत ब्रिटिश पेट्रोलियमध्ये त्यांचे काका काम करत होते. चष्म्याचा मालक हा लिलावातून मिळालेला पैसा आपल्या कन्येला देणार आहे. २१ ऑगस्ट रोजी ‘महात्मा गांधी यांनी वापरलेला चष्मा’ या मथळ्याखाली लिलावाचे आयोजन केले होते. गांधी यांच्या चष्म्याने लिलाव सुरू होण्यापूर्वीच सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. भारतीयांनी देखील हा चष्मा खरेदीसाठी विशेष रस दाखवला होता. चष्म्याला सर्वात अगोदर ६ हजार पौंड ही ऑनलाइन बोली लावण्यात आली होती.

दिल्लीत प्रेशर कुकरमध्ये स्फोटकं; ISIS च्या दहशतवाद्याला अटक

सहा मिनिटात लिलाव

ब्रिटनमधील एका लेटरबॉक्समध्ये बेवारस स्थितीत असलेल्या एका लिफाफ्यात महात्मा गांधी यांचा चष्मा सापडला आणि त्याचा लिलाव सहा मिनिटात झाला. गेल्या महिन्यात लिलाव कंपनीच्या लेटरबॉक्समध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्याला एक लिफाफा सापडला आणि त्यात ऐतिहासिक चष्मा असल्याचे आढळून आले. गोल आकाराचा सोन्याचा मुलामा असलेला हा चष्मा गांधींजी सुरवातीच्या काळात वापरत होते, असे ॲडी स्टोव्ह यांनी सांगितले. हा चष्मा विक्रेत्याच्या कुटुंबाकडे अनेक वर्षांपासून होता. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा शोध, असे स्टोव्ह मानतात. चष्म्याला २० पट अधिक किंमत आल्याचे स्टोव्ह म्हणतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahatma Gandhi's Iconic Glasses Sold in britain