संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतिदूतपदी मलाला युसूफजाई

वृत्तसंस्था
शनिवार, 8 एप्रिल 2017

मलाला युसूफझाईने मलाला फंड या ट्रस्टची स्थापना केली आहे. त्याद्वारे ती जगभरात शिक्षणाचा प्रसार करते. आफ्रिकन देश असो वा मध्य आशिया देश असो, तिच्या संस्थेतर्फे शिक्षणाचे कार्य सर्व ठिकाणी केले जाते.

न्यूयॉर्क - युनोच्या शांतिदूतपदी नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझाईची निवड करण्यात आली आहे. जगातील एखाद्या नागरिकास संयुक्त राष्ट्राकडून देण्यात येणारा हा सर्वोच्च सन्मान असून, संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी मलालाच्या नावाची घोषणा केली आहे. मलालाच्या हातून लहान मुलींच्या शिक्षणाच्या प्रसाराचे कार्य वाढावे या हेतूने हा पुरस्कार देण्यात येत आहे, असे गुटेरेस यांनी म्हटले. सोमवारी याबाबतची औपचारिकता पूर्ण होईल असे त्यांनी म्हटले.

पाकिस्तानमध्ये शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या मलालाविरोधात तालिबानचे दहशतवादी होते. या भागात शिक्षणाचा प्रसार थांबव असे त्यांनी तिला वेळोवेळी सांगितले होते; परंतु मलालाने त्याकडे दुर्लक्ष करत शिक्षण घेणे आणि त्याचा प्रसार करणे थांबवले नाही. दहशतवाद्यांनी 2012 मध्ये तिच्यावर हल्ला करत तिला ठार करण्याचा प्रयत्नही केला. त्या हल्ल्यातून ती बचावली आणि पुन्हा आपले शिक्षण प्रसाराचे कार्य सुरू ठेवले. तिच्या या कार्याची दखल घेत नोबेल कमिटीने तिला शांततेचा 2014 चा नोबेल पुरस्कार दिला. हा पुरस्कार स्वीकारणारी ती जगातील सर्वात तरुण व्यक्ती ठरली. भारताच्या कैलाश सत्यार्थींनादेखील हा पुरस्कार देण्यात आला होता.

मलाला युसूफझाईने मलाला फंड या ट्रस्टची स्थापना केली आहे. त्याद्वारे ती जगभरात शिक्षणाचा प्रसार करते. आफ्रिकन देश असो वा मध्य आशिया देश असो, तिच्या संस्थेतर्फे शिक्षणाचे कार्य सर्व ठिकाणी केले जाते. तिचे या कार्यातील समर्पण पाहूनच तिला हा पुरस्कार दिल्याचे गुटेरेस यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malala Yousafzai to become youngest-ever UN Messenger of Peace