मालदीवचे विशेष राजदूत प्रथम भारतात येणार होते

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

मालदीवच्या राष्ट्रपतींनी विशेष राजदूतासाठी परदेश दौऱ्याची जी योजना आखली होती, त्यातील पहिला थांबा भारतात होता. मात्र भारतीय नेतृत्वाच्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे असे होऊ शकले नाही, अशी माहिती विशेष राजदूत अहमद महंमद यांनी आज येथे बोलताना दिली

नवी दिल्ली - मालदीवचे राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांनी आपल्या देशातील राजनैतिक संकटाविषयी विस्ताराने चर्चा करण्यासाठी चीन, पाकिस्तान आणि सौदी अरेबियाला विशेष राजदूत पाठविले होते. तर भारताकडे या प्रकरणात दुर्लक्ष करण्यात आले होते. यावर मालदीवच्या विशेष राजदुतांनी माझ्या या परदेश दौऱ्याचा पहिला थांबा भारत होता, असे स्पष्टीकरण दिले.

मालदीवच्या राष्ट्रपतींनी विशेष राजदूतासाठी परदेश दौऱ्याची जी योजना आखली होती, त्यातील पहिला थांबा भारतात होता. मात्र भारतीय नेतृत्वाच्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे असे होऊ शकले नाही, अशी माहिती विशेष राजदूत अहमद महंमद यांनी आज येथे बोलताना दिली. राष्ट्रपती यामीन यांनी आपल्या देशातील संकटाच्या पार्श्‍वभूमीवर आर्थिक विकासमंत्री महंमद सईद यांना चीनला आणि परराष्ट्रमंत्री महंमद आसिम यांना पाकिस्तानला पाठविले आहे. कृषिमंत्री महंमद सैनी हे सौदी अरेबियाला जाणार आहेत. मालदीवच्या सर्वोच्च न्यायालयाने तुरुंगात बंद विरोधी पक्षाच्या नेत्यांची सुटका करण्याचे आदेश देताना त्यांची सुनावणी राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले होते.

स्थितीवर लक्ष ठेवून असलेल्या भारताने आम्ही मालदीवमधील सरकारने जाहीर केलेल्या आणीबाणीच्या घोषणेने विचलित झालो असून, मुख्य न्यायाधीश तसेच राजकीय नेत्यांची अटक हा चिंतेचा विषय असल्याचे सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maldives india