मालीत सैन्याचा सशस्त्र उठाव; अध्यक्षांसह पंतप्रधानांचाही राजीनामा

वृत्तसंस्था
Thursday, 20 August 2020

कालावधीच्या तीन वर्षे आधीच आपण राजीनामा देत असून कार्यकाळ तातडीने समाप्त होत असल्याची घोषणाही त्यांनी केली. आपले सरकार आणि राष्ट्रीय संसदेचेही विसर्जन करत असल्याचे त्यांनी जनतेला सांगितले.

बामको - मालीत नाट्यमय घडामोडीनंतर अध्यक्ष इब्राहिम बाऊबकर केईटा यांनी मंगळवारी (ता. १८) रात्री उशिरा राजीनामा दिला. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्याविरुध्द आंदोलन सुरू होते. सशस्त्र जवानांनी घराला वेढा घातल्यानंतर काही तासांतच केईटांनी अध्यक्षपद सोडले. त्यानंतर, आंदोलकांनी एकच जल्लोष केला. 

सैनिकांनी अध्यक्षांसह पंतप्रधान बाऊबो सिस्से यांनाही ताब्यात घेतले. ओआरटीएम या राष्ट्रीय वाहिनीवरून मास्क घातलेल्या केईटांनी राजीनाम्याची घोषणा केली. कालावधीच्या तीन वर्षे आधीच आपण राजीनामा देत असून कार्यकाळ तातडीने समाप्त होत असल्याची घोषणाही त्यांनी केली. आपले सरकार आणि राष्ट्रीय संसदेचेही विसर्जन करत असल्याचे त्यांनी जनतेला सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

केईटा २०१३ मध्ये झालेल्या निवडणुकीत अध्यक्ष झाले होते. त्यानंतर, पाच वर्षांनी त्यांची फेरनिवड झाली होती. लोकशाहीच्या आदर्शाबद्दल कौतुक झालेल्या मालीमध्ये सरकारवर बंड नीट हाताळल्याबद्दल सातत्याने टीका होत होती. अल कायदा व तिच्या संलग्न दहशतवादी संघटनाकडून देशाच्या लष्कराला पराभव पत्करावा लागला होता.  मालीतील घडामोडींचा संयुक्त राष्ट्रसंघासह आंतरराष्ट्रीय समुदायाने तीव्र निषेध केला. 

लडाख संघर्षप्रकरणी जीनपिंग यांच्यावर महिलेची टीका; चीनने उचलले कठोर पाऊल

सत्तेत राहण्यासाठी रक्ताचा एक थेंबही सांडण्याची माझी इच्छा नाही. त्यामुळे मी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
- इब्राहिम बाऊबकर केईटा, अध्यक्ष, माली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mali President Ibrahim Baubkar Keita resigns