World Record : चल रे भोपळ्या टुणूक टुणूक; नदी ओलांडत केला 61 किमीचा प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

World Record of US person floating pumpkin

World Record : चल रे भोपळ्या टुणूक टुणूक; नदी ओलांडत केला 61 किमीचा प्रवास

आपण सर्वांनी लाकडी बोट पाहिली आहे. नौका किंवा अनेक मोठ्या बोटीही चित्रपटांत पाहिल्या असतील. मात्र तुम्ही कधी भोपळ्याची बोट पाहिली आहे का? अमेरिकेतील एका व्यक्तीने भोपळ्याची बोट बनवून त्यातून तब्बल ६१ किमीचा प्रवास करत विक्रम रचला आहे.

तलाव, नदीत बोटिंगचा आनंद सर्वांनी घेतला आहे. तुम्ही पॅडल बोट किंवा लाकडी होडी चालवणाऱ्या बोटीनेही नदी पार केली असेल. भोपळ्यात बसून एखाद्या व्यक्तीने नदीत अनेक किलोमीटरचा प्रवास केल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? असाच काहीसा प्रकार अमेरिकेतील नेब्रास्का येथे घडला आहे. एका इंग्लिश वृत्तानुसार, नेब्रास्का येथील एक व्यक्ती जंप बोटीने मिसूरी नदीत पोहोचला आहे. अमेरिकेतील एका व्यक्तीने चक्क भोपळ्यात बसून नदी ओलांडत सुमारे ६१ किमीचा प्रवास करून विक्रम केला आहे.

नेब्रास्का, सिराक्यूज येथील ड्युएन हॅन्सन यांनी एक भोपळा मोठा केला म्हणजे वाढवला. यानंतर भोपळ्याच्या आतील भाग काढला. ऑगस्ट 2022 मध्ये सुमारे 383.7 किलो वजनाचा भोपळा त्याने नदीवर नेला. आपला 60 वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याच्या प्रयत्नात ड्वेनने भोपळ्यात बसून नदीत फेरफटका मारण्याचा निर्णय घेतला. सकाळी साडेसातला सुरु केलेला हा प्रवास संध्याकाळी साडेसहापर्यंत सुरु होता.

ड्वेन म्हणाला की, हे बघायला सोपे वाटत असले तरी हा प्रवास आजिबात सोपा नव्हता. सुमारे 11 तास भोपळ्यात बसलेल्या ड्वेनने आपल्या भोपळ्याचे नाव 'बर्टा' ठेवले होते. यापुढे भविष्यात कधीच असा प्रयत्न करणार नाही असेही त्याने सांगितले. त्याचा विक्रम कोणी मोडला तर त्या व्यक्तीला मी सलाम करेन असेही ते म्हणाले.

नेब्रास्कामध्ये वास्तव्यास असणाऱ्या ड्वेनला आकाराने मोठ्या भाज्या पिकवण्याचा छंद आहे. त्याने भोपळ्यांव्यतिरिक्त आकाराने मोठ्या असणाऱ्या अनेक भाज्या पिकवल्या आहेत. ड्वेनने विश्वविक्रम केला असून तो गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सकडून अधिकृत घोषणेची वाट पाहत आहे. फोटो, व्हिडिओ पाहणे, त्यांची तपासणी करणे, प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे पाहिल्यानंतरच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळते, त्यामुळे सध्या तो या प्रतिक्षेत आहे.

कमी वेळात नदीतून किंवा समुद्रातून पोहण्याचा धाडसी विक्रम अनेकजण करत असतात. अशा अनेक बातम्या आपण ऐकत आलो आहोत. मात्र आता एक वेगळी बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील एका व्यक्तीने भोपळ्यात बसून नदी ओलांडून ६१ किमीचा प्रवास करून विक्रम केला आहे. सध्या या व्यक्तीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.