मंगोलियात बाळासह महिलेला रुग्णालयाने काढलं बाहेर; आंदोलनानंतर पंतप्रधानांनी दिला राजीनामा

mangolia
mangolia

उलान बटोर - पूर्व आशियातील देश मंगोलियाचे पंतप्रधान खुरेलसुख उखाना यांनी त्यांचा राजीनामा संसदेत दिला आहे. देशातील एका कोरोनाबाधित महिलेशी गैरवर्तन झाल्यामुळे त्यांनी माफी मागून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. महिलेला रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या वागणुकीमुळे लोकांनी सरकारविरोधात आंदोलन सुरू केलं आहे. 

मंगोलियाची राजधानी उलान बटोर इथं कोरोनाची लागण झालेल्या महिलेनं रुग्णालयात एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर रुग्णालय प्रशासन महिलेला क्वारंटाइन केंद्रात घेऊन जात होते. कडाक्याच्या थंडीतही रुग्णालयाने बाळ आणि महिलेला फक्त एक कुर्ता, पायजमा आणि प्लास्टिकचे शूज दिले. रुग्णालयाच्या या बेजबाबदार कृत्याचा व्हिडिओ कोणीतरी शूट केला आणि तो व्हायरल झाला.

रुग्णालयाने संबंधित महिलेला दिलेल्या वागणुकीमुळे देशातील लोक संतप्त झाले. त्यानतंर लोकांनी सरकार विरोधात आंदोलनही सुरु केलं. उलान बटोरमध्ये हजारोंच्या संख्येनं लोक गोळा झाले. राजधानीतच आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर पंतप्रधानांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. 

मंगोलियात अशी परंपरा आहे की नवजात बाळाला जन्म दिल्यानंतर महिलेला एक महिन्यापर्यंत घरातून बाहेर पडायचं नसतं. अशा परिस्थितीत सुरक्षा महत्त्वाची असते. त्यातही रुग्णालय प्रशासनाने दिलेली वागणूक ही त्या मातेबद्दलची असंवेदनशीलताच दाखवत असल्याचं आंदोलकांनी म्हटलं. 

पंतप्रधान खुरेलसुख उखाना यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांच्यासोबत आरोग्य मंत्री आणि इतर काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान खुरेलसुख यांनी लोकांची माफीही मागितली आहे. ते म्हणाले की, दुर्दैवाने त्या आईला इतर ठिकाणी नेण्यात येत असताना एक चूक झाली. पंतप्रधान म्हणून या घटनेची जबाबदारी मला घ्यायला हवी.

मंगोलियाची एकूण लोकसंख्या 32 लाखांपेक्षा जास्त आहे. आतापर्यंत देशात फक्त 1584 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या संसर्गाचं प्रमाण देशात कमी असून आतापर्यंत दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून सद्या 536 जणांवर उपचार सुरु आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com