एच-1 बी व्हिसा धोरणात बदल नाही; भारतीय तंत्रज्ञांना दिलासा

पीटीआय
बुधवार, 10 जानेवारी 2018

वॉशिंग्टन : एच-1 बी व्हिसाच्या आधारे अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना बळजबरीने देश सोडण्यास भाग पाडणारा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही, असे ट्रम्प प्रशासनाने आज स्पष्ट केले. त्यामुळे व्हिसा धोरणातील संभाव्य बदलामुळे भवितव्य टांगणीला लागलेल्या येथील भारतीय तंत्रज्ञांना दिलासा मिळाला आहे. 

वॉशिंग्टन : एच-1 बी व्हिसाच्या आधारे अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना बळजबरीने देश सोडण्यास भाग पाडणारा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही, असे ट्रम्प प्रशासनाने आज स्पष्ट केले. त्यामुळे व्हिसा धोरणातील संभाव्य बदलामुळे भवितव्य टांगणीला लागलेल्या येथील भारतीय तंत्रज्ञांना दिलासा मिळाला आहे. 

एच-1बी व्हिसा धोरणाचे नियम अधिक कडक करण्याचा ट्रम्प प्रशासनाचा विचार असून, यामुळे सुमारे साडेसात लाख भारतीयांना देश सोडावा लागू शकतो, असा अहवाल काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाल्याने भारतीयांमध्ये खळबळ उडाली होती. या अहवालानुसार, एच-1 बी व्हिसाधारकांची व्हिसाची मुदत वाढविण्यास नकार दिला जाणार होता.

अमेरिकेत या व्हिसाधारकांमध्ये पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक भारतीयच असल्याने याचा सर्वाधिक फटका त्यांनाच बसला असता. या पार्श्‍वभूमीवर यूएस सिटीझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस (यूएससीआयएस) या विभागाने, व्हिसा धोरण बदलाचा विचार नसल्याचे स्पष्ट केल्याने येथील भारतीय आनंदी झाले आहेत. सध्याच्या नियमानुसार, व्हिसाधारकांना सहा वर्षांची मुदतवाढ मिळू शकते. "व्हिसा नियम बदलले असते, तरी व्हिसाधारक दुसऱ्या एका नियमानुसार एक वर्षाची मुदतवाढ मागू शकले असते,' असेही "यूएससीआयएस'च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

अमेरिकेतूनही होता विरोध 
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या "अमेरिका फर्स्ट'च्या धोरणानुसार अनेक धोरणांमध्ये बदल करण्याचा प्रयत्न असून, त्यामध्ये व्हिसा धोरणाचा समावेश आहे. व्हिसा धोरणातील संभाव्य बदलाला भारत सरकार, अमेरिकेतील भारतीय यांच्याबरोबरच अमेरिकेतील उद्योग आणि काही खासदारांनीही विरोध केला होता. "नॅसकॉम' या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यापारी संघटनेनेही संभाव्य बदलामुळे विपरीत परिणाम होण्याचा इशारा दिला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news H1B Visa policy US Immigration Donald Trump Indian IT companies