एव्हरेस्टवर 'एकट्या' नेपाळचीच चढाई 

एव्हरेस्टवर 'एकट्या' नेपाळचीच चढाई 

नवी दिल्ली : जगातील सर्वांत उंच शिखर एव्हरेस्टची उंची संयुक्तपणे मोजणी करण्याचा भारताचा प्रस्ताव नेपाळने नाकारला आहे. 2015 च्या भूकंपानंतर नेपाळच्या सर्वेक्षण विभागाच्या वतीने हिमालयाच्या उंचीचे पुन्हा मोजमाप करण्याचे ठरवले आहे. मात्र, एव्हरेस्ट मोजण्यासाठी आवश्‍यक वाटणारी मदत भारत आणि चीनकडून घेऊ, असे नेपाळच्या सर्व्हेक्षण विभागाचे महासंचालक गणेश भट्टा यांनी सांगितले. दरम्यान, सूत्राने दिलेल्या माहितीनुसार हा प्रस्ताव नाकारण्यामागे चीनचा हात असल्याचे सांगितले जात आहे. 

2015 च्या एप्रिलमध्ये 7.8 रेक्‍टर स्केल एवढ्या तीव्रतेचा भूकंप हिमालयीन देशात आला होता. या विनाशकारी भूकंपाने 8 हजारहून अधिक नागरिकांचा बळी गेला आणि हजारो जखमी झाले. त्यानंतर एव्हरेस्टच्या स्थितीत बदल झाल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे नव्याने उंची मोजण्याची तयारी नेपाळने केली आहे. त्यानुसार भारताच्या संस्थेने एव्हरेस्ट मोजण्याबाबतचा प्रस्ताव नेपाळच्या सर्वेक्षण विभागासमोर मांडला होता.

या संदर्भात मेजर जनरल गिरीश कुमार म्हणाले, की भारताच्या प्रस्तावाबाबत नेपाळकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद आला नाही. मात्र आता ते म्हणतात, की या सर्वेक्षणात भारत किंवा चीन या दोघांनाही सहभागी करून घेतले जाणार नाही.

नेपाळचा सर्वेक्षण विभाग स्वतः मोजणी करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या संदर्भात काठमांडू येथील बैठकीत भारतीय प्रतिनिधीने उपस्थिती दर्शविली होती.

या वेळी चीनचा प्रतिनिधी देखील उपस्थित होता. या वेळी भारताकडून प्रस्ताव मांडण्यात आला; परंतु नेपाळने नकार दिला. असाच प्रस्ताव चीनकडून आला असून, त्यांनाही नकार कळवल्याचे भट्टा यांनी दूरध्वनीवरून सांगितले.

1975 आणि 2005 मध्ये चीनने एव्हरेस्टची उंची मोजण्याचे अभियान राबवले, तर भारताने हेच अभियान 1956 मध्ये राबवले होते. 1855 मध्ये सर जॉर्ज एव्हरेस्टच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा एव्हरेस्ट शिखराची उंची जाहीर केली होती आणि जगातील सर्वांत उंच शिखर म्हणून घोषित केले होते. असे असतानाही नेपाळने भारताची मदत नाकारली आहे.

एव्हरेस्टची उंची मोजण्यासंदर्भात भारत आणि चीनची शिखराच्या माहितीसंदर्भात मदत लागणार असल्याचे नेपाळने म्हटले आहे. एव्हरेस्ट मोजण्यास 2019 मध्ये प्रारंभ होईल आणि मोजमाप करताना चीनची हद्द ओलांडली जाणार नाही, याची काळजी सर्वेक्षक घेतील, असे नेपाळने नमूद केले. 

''एव्हरेस्टच्या उंचीत किरकोळ बदल झाला असेल आणि त्याचा थेट परिणाम परिसरातील नागरिकांच्या राहणीमानावर होणार नाही. 
- कुशलराज, शास्त्रज्ञ, बंगळूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com