UNSC Debate: सागरी सुरक्षेसाठी पंतप्रधान मोदींनी सांगितली पंचसूत्री

दहशतवादी कारवायांसाठी सागरी मार्गांचा गैरवापर
Modi_UNSC
Modi_UNSC

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत (UNSC) सागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर खुली चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ही बैठक पार पडली. समुद्री मार्गांचा वापर हा चाचेगिरी आणि दहशतवादी कारवायांसाठी केला जात आहे. त्यामुळे सागरी सुरक्षेसाठी पंचसूत्रींची आवश्यकता आहे, असं यावेळी मोदी म्हणाले.

UNSC तील चर्चेच्या केंद्रस्थानी सागरी सुरक्षेचा मुद्दा होता. इथल्या सुरक्षेसाठी सहकार्य वाढवणं गरजेचं असल्याचं यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले. त्याचबरोबर सागरी सुरक्षेमध्ये एक व्यापक दृष्टीकोन असणं गरजेचं आहे. यामध्ये वैध सागरी हालचालींची सुरक्षा व्हावी त्याचबरोबर सागरी क्षेत्राच्या पारंपारिक आणि बिगर पारंपारिक धोक्यांपासून वाचलं जावं.

सागरी व्यापारातील निर्बंध हटवायला हवेत

सागरी सुरक्षेसाठी मोदींनी पंचसूत्री सांगितल्या. यामध्ये पहिलं सूत्र सांगताना मोदी म्हणाले, "आपल्याला अधिकृत सागरी व्यापारातील निर्बंध हटवायला हवेत. आपल्या सर्वांची समृद्धी सागरी व्यापाराच्या सक्रियतेवर अवलंबून आहे. यामध्ये अडचणी आल्यास संपूर्ण वैश्विक व्यवस्थेसाठी आव्हान होऊ शकतं."

शांततापूर्ण पद्धतीनं सागरी वाद-विवादांवर तोडगा निघावा

दुसरं सूत्र सांगताना मोदी म्हणाले, "सागरी वाद-विवादांचं समाधान शांततापूर्ण आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आधारावर व्हायला हवं. आपापसांतला भरवसा आणि विश्वासासाठी हे अतिआवश्यक आहे. याच माध्यमातून आपण वैश्विक शांतता आणि स्थिरता निश्चित करु शकतो."

समुद्री धोक्यांचा मिळून सामना करावा लागेल

तिसरं सूत्र सांगताना मोदी म्हणाले, "आपल्याला नैसर्गिक आपत्ती आणि चाच्यांमार्फत निर्माण होणाऱ्या सागरी धोक्यांचा मिळून सामना करावा लागेल. या विषयावर क्षेत्रीय सहकार्य वाढवण्यासाठी भारतानं अनेक पावलं उचलली आहेत. चक्रीवादळ, त्सुनामी आणि प्रदुषणासंबंधी सागरी आपत्तींविरोधात आम्ही कायम पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे."

सागरी संसाधन आणि पर्यावरणाचं जतन करावं लागेल

"आपल्याला सागरी पर्यावरण आणि सागरी संसाधनांचं जतन करावं लागेल. कारण आपल्याला माहितीच आहे की, समुद्रांचा जलवायूवर थेट प्रभाव पडतो. यासाठी आपल्याला सागरी पर्यावरणाला प्लास्टिक आणि तेलगळतीसारख्या प्रदुषणापासून वाचवावं लागेल," असं चौथ सूत्र विषद करताना मोदींनी सांगितलं.

जबाबदार सागरी संपर्काला प्रोत्साहन दिलं जावं

मोदी पाचवं सूत्र सांगताना म्हणाले, "आपल्याला जबाबदार सागरी संपर्काला प्रोत्साहन द्यायला हवं. हे स्पष्ट आहे की, सागरी व्यापार वाढवण्यासाठी पायाभूत रचना निर्माण करणं गरजेचं आहे. मात्र, अशा योजनांच्या विकासात देशांची आर्थिक स्थिरता आणि अवशोषण क्षमतेला देखील लक्षात घ्यायला हवं"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com