मारिउपोल पडले! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तोफगोळे जप्त करण्यात आले
मारिउपोल पडले!

मारिउपोल पडले!

पोकरोव्ह (युक्रेन) - युक्रेनमधील मारिउपोल शहरावर ताबा घेतल्याचा घेतल्याचा दावा रशियाने केला आहे. युक्रेनविरोधातील युद्धातील हा सर्वांत मोठा विजय असल्याचे रशियाने सांगितले. मारिउपोलमधील पोलाद प्रकल्पात लपलेल्या दोन हजार ४३७ युक्रेनी सैनिकांनी रशियाच्या फौजांसमोर आत्मसमर्पण केल्याचा दावाही करण्यात आला आहे.

रशिया-युक्रेनमधील युद्धाला २४ फेब्रुवारीला सुरुवात झाली आहे. सुमारे तीन महिने रशियाचे सैन्य युक्रेनमध्ये तळ ठोकून आहे. देशाचे महत्त्वाचे बंदर असलेले मारिउपोल रशियाच्या हल्ल्यांमुळे उद्‍ध्वस्त झाले असून सुमारे २० हजार नागरिकांचा बळी गेला आहे. युक्रेनी नागरिकांचे अस्तित्व असलेला अझोवत्सल पोलाद प्रकल्प हा मारिउपोलचा शेवटचा गडही रशियाने जिंकल्याची माहिती रशियाचे संरक्षण मंत्री सर्जी शोयगू यांनी अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना दिल्याचे प्रवक्ते इगोर कोनाशेन्‍कोविह यांनी शुक्रवारी सांगितले.

रशियाच्या या दाव्यावर युक्रेनकडून अजून काहीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. रशियाची सरकारी वृत्तसंस्था ‘आरआयए नोव्होत्सी’च्या माहितीनुसार या पोलाद प्रकल्पात लपलेले युक्रेनी सैनिक सोमवारपासून शरण येण्यास सुरुवात झाली होती. काल ५०० सैनिकांनी रशियाच्या सैन्यापुढे आत्मसमर्पण केले. त्यांनी शरणागती पत्करताच रशियाने त्यांना कैद केले आहे. काही जणांना पूर्वीच्या दंड वसाहतीत ठेवले आहे तर बाकीचे रुग्णालयात आहेत. पोलाद प्रकल्पाच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अझोव्ह रेजिमेंटचे हक्क रशियाने काढून घेतले आहेत. चिलखती वाहनासह या प्रकल्पात लपलेल्या अझोव्ह कमांडरला ताब्यात घेतल्याची माहिती रशियाने दिली. दरम्यान, युद्धामुळे जगात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होण्याचा धोका असल्याचे संयुक्त राष्‍ट्रातील (यूएन) अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस ग्रीनफिल्ड यांनी सांगितले. युक्रेनच्या बंदरांवर रशियाने जवळजवळ ताबा मिळविला. यामुळे अन्नधान्याचा तुटवडा भासण्याचा धोका दहापटीने वाढला आहे.

सांस्कृतिक केंद्रावर क्षेपणास्त्रांचा हल्ला

खारकिव्हच्या ईशान्येकडील भागात रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ले सुरुच आहे. रशियाच्या फौजांनी तेथील सांस्कृतिक केंद्रावर झालेल्या हल्ल्यात सात जण जखमी झाले, असा दावा युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी करून यावरून रशियावर टीका केली आहे. ते म्हणाले, की युक्रेनमधील शाळा, सांस्कृतिक केंद्रांना रशिया लक्ष्य करीत आहे. अशा ठिकाणी हल्ले करणाऱ्यांच्या डोक्यात काय चालले असेल?

दिवसभरात घडामोडी

फिनलंडमधील मुख्य गॅस कंपनी गॅसमचा नैसर्गिक इंधनाचा पुरवठा रशियाचा आजपासून थांबविणार असल्याची कंपनीची माहिती.

जगभरातील अन्नधान्याच्या आपत्कालीन संकटावर मात करण्यासाठी अमेरिका २.३ अब्ज डॉलर मदत करण्याची अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी सांगितले.

युक्रेनमधील लुहान्स्कमधील शाळेवर रशियाने तोफगोळे डागले. तेथे २०० लोकांनी आश्रय घेतला होता. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला.

Web Title: Mariupol Fell Russia Claims

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..