
आपला कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर व्हाइट हाऊसचा निरोप देत डोनाल्ड ट्रम्प हे पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्यासह फ्लोरिडाला गेले. ट्रम्प यांच्याबरोबर विमानात त्यांचे कुटुंबीयही होते.
वॉशिंग्टन- जो बायडन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली आहे. परंतु, त्यांनी शपथ घेण्यापूर्वी व्हाइट हाऊसमध्ये एका विषयाची मोठी चर्चा सुरु झाली आहे. आपला कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर व्हाइट हाऊसचा निरोप देत डोनाल्ड ट्रम्प हे पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्यासह फ्लोरिडाला गेले. ट्रम्प यांच्याबरोबर विमानात त्यांचे कुटुंबीयही होते. त्यांनी विमान कर्मचाऱ्यांशी काहीवेळ चर्चाही केली. परंतु, याचदरम्यान एक अशी असामान्य घटना घडली की, त्याची सर्वत्र चर्चा सुरु झाली.
दि.20 जानेवारी रोजी जेव्हा ट्रम्प आणि मेलानिया यांनी व्हाइट हाऊस सोडले. त्यावेळी नियमानुसार निरोप देताना फर्स्ट लेडीला आपल्या कर्मचाऱ्यांप्रती आभार मानत स्वतः एक थँक्यू नोट लिहावी लागते. या चार वर्षांत अध्यक्षांच्या कुटुंबीयांची काळजी घेतलेल्या कर्मचाऱ्यांप्रती या नोटमध्ये आभार मानले जातात. परंतु, मेलानिया ट्रम्प यांनी व्हाइट हाऊस सोडताना कर्मचाऱ्यांचे आभार मानताना लिहिलेली थँक्यू नोट स्वतः न लिहिता दुसऱ्यांकडून लिहून घेतली होती आणि त्यावर फक्त स्वतःची स्वाक्षरी केली.
हेही वाचा- छप्पर फाड के! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला मिळतो एवढा पगार; तरीही काहींनी नाकारलं वेतन
व्हाइट हाऊसमध्ये सुमारे 80 कर्मचारी काम करतात. त्या सर्वांना थँक्यू नोट मिळाली आहे. फर्स्ट लेडी स्वतः आपल्या हाताने पत्र लिहितात अशी धारणा आहे. परंतु, मेलानिया यांनी कनिष्ठ पातळीवरील ईस्ट विंगच्या कर्मचाऱ्याकडे ही जबाबदारी सोपवली आणि त्यावर केवळ आपली स्वाक्षरी केली.
'सीएनएन'च्या वृत्तानुसार मेलानिया ट्रम्प यांनी नुकताच झालेल्या घटनांवर मौन साधले होते. परंतु, व्हाइट हाऊसमधून बाहेर पडणे किंवा वॉशिंग्टन सोडण्याबाबत त्यांच्या मनात काहीच दुःख नव्हते. त्यांना फक्त आपल्या घरी परतायचे होते. 'सीएनएन'सोबत थँक्य नोट्सवर चर्चा करणाऱ्या एका तज्ज्ञाने म्हटले की, फर्स्ट लेडीकडून अशा पद्धतीने आभार मानने ही एक प्रथा आहे आणि अनेकवेळा राष्ट्राध्यक्षही आपल्या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पत्र लिहितात.
हेही वाचा- जो बायडन यांचं मंत्रिमंडळ 'डन'; असं झालंय खातेवाटप
व्हाइट हाऊसमध्ये प्रशासकीय कामांव्यतिरिक्त बटलर, स्वयंपाकी, सफाई कर्मचारी, माळी आणि देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे सर्वजण गेल्या एक दशकापासून किंवा त्याहून अधिक काळापासून व्हाइट हाऊसमध्ये काम करत आहेत.