जर्मनीत लक्षावधी स्थलांतरित ही घोडचूक: ट्रम्प

वृत्तसंस्था
सोमवार, 16 जानेवारी 2017

मर्केल यांनी लक्षावधी बेकायदेशीर निर्वासितांना जर्मनीमध्ये प्रवेश देण्याची घोडचूक केली आहे. स्थलांतरितांच्या मुद्याचा ब्रिटनच्या युरोपिअन युनियनमधून बाहेर पडण्याशी संबंध आहेच....

न्यूयॉर्क- जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी जर्मनीत 10 लाखांहून अधिक निर्वासितांना प्रवेश देऊन घोडचूक केल्याचे परखड मत अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे.

ट्रम्प यांनी ब्रिटीश व जर्मन वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना दिलेल्या मुलाखतीमध्ये परराष्ट्र धोरणासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली. अमेरिकेसाठी फायदेशीर व्यापार करार व सीमारेषांची सुरक्षा, हे प्राधान्यक्रमावरील विषय असल्याचे ट्रम्प यांनी यावेळी स्पष्ट केले. अमेरिकेची इतर देशांबरोबर (विशेषत: चीन) असलेली वित्तीय तूट भरुन काढणे अत्यावश्‍यक असल्याचे प्रतिपादन ट्रम्प यांनी केले. याचबरोबर, मुक्त व्यापारापेक्षा (फ्री ट्रेड) आमच्या प्रशासनाचा भर स्मार्ट ट्रेडवर असेल, असे त्यांनी सांगितले.

"मर्केल या युरोपिअन युनियनमधील सर्वांत महत्त्वाच्या नेत्या असल्याची माझी धारणा होती. मात्र त्यांनी लक्षावधी बेकायदेशीर निर्वासितांना जर्मनीमध्ये प्रवेश देण्याची घोडचूक केली आहे. स्थलांतरितांच्या मुद्याचा ब्रिटनच्या युरोपिअन युनियनमधून बाहेर पडण्याशी संबंध आहेच. स्थलांतरितांना स्वीकारण्याची बळजबरी करण्यात आली नसती; तर मला वाटते, ब्रेक्‍झिट घडले नसते,'' असे ट्रम्प म्हणाले.

Web Title: Merkel made 'catastrophic mistake' on migrants, says Trump