माईक पॉंपेओ हे "सीआयए'चे नवे संचालक

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 जानेवारी 2017

पॉंपेओ हे या कामासाठी "अयोग्य उमेदवार' असल्याचे टीकास्त्र डेमोक्रॅटिक नेते रॉन वेडेन यांनी केली होती. पॉंपेओ यांची निवड 66-32 अशा मतांनी झाल्याचे निष्पन्न झाले आहे

वॉशिंग्टन - अमेरिकेची गुप्तचर संस्था असलेल्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीच्या (सीआयए) संचालकपदाची शपथ माईक पॉंपेओ यांनी घेतली. पॉंपेओ हे "कॉंग्रेस'चे माजी सदस्य आहेत.

"जगामधील सर्वश्रेष्ठ गुप्तचर खात्याचे नेतृत्व आता तुम्ही करणार आहात. तुमच्या नेतृत्वाखाली काम करणारे स्त्री व पुरुष हे धैर्य या शब्दाला खरा अर्थ प्राप्त करुन देत असतात,'' असे गौरवोद्गार अमेरिकेचे उप राष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांनी या प्रसंगी बोलताना काढले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शिफारस केलेल्या पॉंपेओ यांच्या नावास सिनेटने सहमती दर्शविली.

पॉंपेओ यांच्या नावास डेमोक्रॅटिक पक्षाने विरोध दर्शविला होता. अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीमध्ये रशियाने हस्तक्षेप केल्याच्या आरोपासंदर्भात पॉंपे यांची भूमिका पारदर्शी नसल्याची टीका डेमोक्रॅटिक पक्षाकडून करण्यात आली होती. पॉंपेओ हे या कामासाठी "अयोग्य उमेदवार' असल्याचे टीकास्त्र डेमोक्रॅटिक नेते रॉन वेडेन यांनी केली होती. पॉंपेओ यांची निवड 66-32 अशा मतांनी झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

पॉंपेओ हे कॅन्सासमधील रिपब्लिकन नेते आहेत. जागतिक राजकारणामध्ये अमेरिकेपुढे आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होत असताना सीआयएच्या नव्या भूमिकेबद्दल अत्यंत उत्सुकता आहे. या पार्श्‍वभूमीवर पॉंपेओ यांची ही निवड अत्यंत संवेदनशील मानली जात आहे.

Web Title: Mike Pompeo sworn in as CIA director