बेरोजगारी, नोटाबंदीमुळेच देशात लिंचींग: राहुल गांधी

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

संसदेत पंतप्रधान मोदी यांना मिठी मारल्यानंतर माझ्या पक्षातील काही लोक नाराज झाले होते, त्यांना तो प्रकार आवडला नव्हता. तसेच माझ्या वडिलांच्या मारेकऱ्यांना म्हणजेच एलटीटीई प्रमुख प्रभाकरन याला मारण्यात आले, तेव्हा ते मला व बहिण प्रियांकाला आवडले नव्हते. त्याच्या रडणाऱ्या मुलांमध्ये मी मला बघत होतो, असे राहुल यांनी सांगितले.   

हॅम्बर्ग : नोटाबंदी, बेरोजगारी आणि जीएसटीमुळे भारतात जमावाकडून करण्यात येत असलेल्या हत्यांमध्ये (लिंचींग) वाढ झाल्याची जोरदार टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. द्वेषाला प्रेमानेच जिंकता येऊ शकते, त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिठी मारल्याचे राहुल गांधी यांनी यावेळी स्पष्ट केले.

बेरोजगारीचे वाढते प्रमाण, नोटाबंदीमुळे लहान व्यवसाय भरकटणे तसेच जीएसटीची अयोग्य प्रकारे अंमलबजावणी या प्रकारांमुळे मारहाणीचे व हत्यांचे प्रमाण वाढले आहे, असा आरोप राहुल यांनी सरकारवर केला.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चुकीचे निर्णय घेऊन भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी केली आहे. नोटाबंदीमुळे मध्यम व लघु व्यवसाय बंद पडले. देशात अनेकांचे व्यवसाय बंद पडल्याने बेरोजगारीत वाढ झाली. तसेच जीएसटी योग्य प्रकारे लागू न केल्याने गोंधळ जास्त वाढला व यातूनच संताप व नाराजी वाढून समाजात हत्यांचे प्रमाण वाढले आहे, असाही आरोप राहुल यांनी केला. 

'21व्या शतकात लोकांना विकास प्रक्रियेत सहभागी करून न घेणे धोक्याचे आहे. जर सरकारने लोकांना योग्य दृष्टीकोन दिला नाही, तर दुसरे कोणीतरी देईल. त्यामुळे आदिवासी, दलित व अल्पसंख्यांकांना या विकासापासून दूर ठेवणे हे धोक्याचे आहे,' असेही राहुल यांनी सांगितले. भाजप सरकारला जे फायदे श्रीमंतांना मिळतात, ते फायदे आदिवासी, अल्पसंख्यांक, शेतकरी व मागासवर्गीयांना मिळून द्यायचे नाहीयेत, असाही आरोप त्यांनी यावेळी केला.

संसदेत पंतप्रधान मोदी यांना मिठी मारल्यानंतर माझ्या पक्षातील काही लोक नाराज झाले होते, त्यांना तो प्रकार आवडला नव्हता. तसेच माझ्या वडिलांच्या मारेकऱ्यांना म्हणजेच एलटीटीई प्रमुख प्रभाकरन याला मारण्यात आले, तेव्हा ते मला व बहिण प्रियांकाला आवडले नव्हते. त्याच्या रडणाऱ्या मुलांमध्ये मी मला बघत होतो, असे राहुल यांनी सांगितले.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mob lynching in India due to joblessness and demonetization and gst said rahul gandhi