esakal | तालिबानकडून सरकारची घोषणा, पाहा कसं आहे मंत्रिमंडळ?
sakal

बोलून बातमी शोधा

तालिबानकडून सरकारची घोषणा, पाहा कसं आहे मंत्रिमंडळ?

तालिबानकडून सरकारची घोषणा, पाहा कसं आहे मंत्रिमंडळ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सरकारची सूत्रे मुल्ला अखुंदकडे, कोण-कोण आहे मंत्रिमंडळात?

काबूल : अफगाणिस्तानवर पूर्णपणे ताबा मिळविल्यानंतर तालिबानने आपल्या हंगामी सरकारची घोषणा केली. सरकारची सूत्रे मुल्ला मोहंमद हसन अखुंद याच्याकडे असणार आहेत. त्याला हंगामी पंतप्रधानपद देण्यात आले आहे. तालिबानचा प्रवक्ता जबिउल्लाह मुजाहिदने या नव्या सरकारची माहिती दिली. नव्या सरकारचा सूत्रे घेण्याचा कार्यक्रम आज होण्याची शक्यता आहे.

तालिबानच्या हंगामी सरकारमधील मंत्रिमंडळावर गेली वीस वर्षे संघटनेवर वर्चस्व मिळविलेल्यांची वर्णी लागली आहे. अमेरिकेबरोबर चर्चेत सहभागी झालेला आणि सैन्यमाघारीबाबत त्यांच्याबरोबर झालेल्या करारावर स्वाक्षरी करणारा मुल्ला अब्दुल घनी बरादर याच्याकडे उपपंतप्रधानपदाची सूत्रे देण्यात आली आहेत. सर्वोच्च नेतृत्वाला साह्य करण्यासाठी मौलवी हन्नाफी याच्याकडेही जबाबदारी देण्यात आली आहे. हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनेच्या संस्थापकाचा मुलगा सिराजुद्दीन हक्कानी याच्याकडे गृहमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अमेरिकेने त्याला ‘मोस्ट वाँटेड’च्या यादीत टाकले होते, तसेच त्याच्यावर ५० लाख डॉलरचे बक्षीसही जाहीर केले होते. भारतीय दूतावासावरील हल्ल्यामागेही त्याचा हात होता. सिराजुद्दीनचे अल कायदाशी जवळचे संबंध आहेत. देशाचे माजी अध्यक्ष हमीद करझाई यांच्या हत्येचा कट २००८ मध्ये आखण्यात आला होता, त्यातही त्याचा सहभाग होता. हक्कानी नेटवर्कवर अमेरिकेसह अनेक देशांनी बंदी घातली आहे.

तालिबानच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या महंमद उमर याचा मुलगा मुल्ला याकूब याच्याकडे संरक्षण मंत्रिपद देण्यात आले आहे. अमेरिकेने सैन्यमाघारीचा निर्णय घेतल्यावर अफगाणिस्तानचे जिल्हे एकामागून एक ताब्यात घेण्याच्या तालिबानच्या मोहिमेचे नेतृत्व याकूबनेच केले होते. तालिबानचा सर्वोच्च म्होरक्या शेख हैबतुल्ला अखुन्जादा हा इराणमधील खोमेनींप्रमाणे अफगाणिस्तानचा सर्वोच्च प्रमुख बनण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: राणेंच्या वाहनावरील ड्रायव्हरचा मृत्यू; कुटुंबियांनी केले गंभीर आरोप

‘सर्वसमावेश’ नाहीच

आंतरराष्ट्रीय समुदायाने सर्वसमावेशक सरकारची स्थापना करण्याचे आवाहन केले असतानाही तालिबान्यांच्या या मंत्रिमंडळात इतर समुदायांचे प्रतिनिधीत्व दिसत नाही. वास्तविक, सर्वांना सामावून घेण्यासाठीच सरकार स्थापनेच्या घोषणेला विलंब होत असल्याचे तालिबानने दोन दिवसांपूर्वी म्हटले होते. प्रवक्ता मुजाहिद याने, हे हंगामी सरकार असल्याचे स्पष्ट केले असले तरी, सरकारचे कामकाज कसे असेल, देशात बदल कसा घडवून आणणार, याबाबत काहीही माहिती देण्यात आलेली नाही. देशात निवडणूक घेण्याबाबतही तालिबानने चकार शब्द काढलेला नाही. या मंत्रिमंडळाच्या निवडीतही पाकिस्तानचा हस्तक्षेप झाल्याचा दावा काही विदेशी माध्यमांनी केला आहे. पाकिस्तानच्या आयएसआयचे प्रमुख काही दिवसांपुर्वीच काबूलला गेले होते. त्यांनी तेथे तालिबानी नेत्यांबरोबर चर्चा केली होती. कंदाहार येथे जन्मलेल्या अखुंद यानेच बामियान येथील विशाल बुद्धमूर्ती फोडण्याचा आदेश दिला होता. हे धार्मिक कृत्य असल्याचे त्याने त्यावेळी म्हटले होते.

loading image
go to top