26/11 हल्ल्यातील दोषीला मिळणार दरमहा दीड लाख रुपये; संयुक्त राष्ट्र संघटनेचा निर्णय

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 11 December 2020

दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा कमांडर आणि 26/11 मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झकीऊर रेहमान लखवीला आता प्रती महिना खर्चासाठी दिड लाख रुपये मिळणार आहे.

जिनेव्हा- दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा कमांडर आणि 26/11 मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झकीऊर रेहमान लखवीला आता प्रती महिना खर्चासाठी दिड लाख रुपये मिळणार आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेने ही रक्कम मंजूर केली आहे. पाकिस्तानचे अणुशास्त्रज्ञ मोहम्मद सुलतान बशीरुद्दीन यांनाही प्रती महिना पैसे मिळणार आहेत. या दोघांना अशा प्रकारचा खर्च द्यावा अशी विनंती पाकिस्तानने केली होती. संयुक्त राष्ट्राने ही विनंती मान्य केली आहे. 

शत्रूंच्या उडणार चिंध्या; 1 मिनिटात 700 राऊंड फायर करणार DRDOची सब-मशीनगन

झकीऊर रेहमान लखवी हा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा ऑपरेशन प्रमुख आहे, तर मोहम्मद सुलतान बशीरुद्दीन यांनी पाकिस्तानच्या अॅटोमिन एनर्जी कार्यक्रमात महत्वाची भूमिका बजावली आहे. याच बशीरुद्दीन यांनी अफगानिस्तानमध्ये जाऊन लादेनची भेट घेतली होती. विशेष म्हणजे पाकिस्तान सरकारने मोहम्मद सुलतान बशीरुद्दीन यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला आहे. लखवी आणि बशीरुद्दीन यांना खर्च देण्याचा निर्णय सुरक्षा परिषदेच्या 1267 समितीने घेतला आहे.  

लखवी आणि बशीरुद्दीन यांना जेवणासाठी 50 हजार, औषधांसाठी 45 हजार, सार्वजनिक गोष्टींचा वापर 20 हजार, वकिलांची फी 20 हजार आणि वाहतूक खर्चासाठी 15 हजार रुपये असा एकूण दीड लाख रुपये खर्च देण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने घेतला आहे. विशेष म्हणजे या दोघांनाही संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत टाकलं आहे. सुरक्षा परिषदेच्या 1267 समितीच्या नियमानुसार लखवी आणि बशीरुद्दीन यांना हा खर्च मिळत आहे. सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावानुसार मूलभूत खर्च दिला जातो. ज्यात जेवण, औषधं, उपचार, विमा अशा गोष्टींचा समावेश करण्यात येतो. 

काँग्रेसच्या पाठिंब्याने भाजपचा विजय; 'राज'कारणात शत्रूंचं झालं...

झकीऊर रेहमान लखवी हा मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये दोषी आढळला आहे. त्यानंतर त्याचे नाव दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यात आले. जगभरातून पाकिस्तानवर दबाव वाढल्यानंतर लखवीला अटक करण्यात आली होती. तुरुंगात असताना लखवी एका मुलाचा बाप झाल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे तो कशाप्रकारच्या अटकेत होता याचा अंदाज येईल.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: monthly expense for terrorist zakiur rehman lakhvi by united nations security council