आतापर्यंत २० हजार भारतीयांनी युक्रेन सोडलं; परराष्ट्र मंत्रालयाची माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आतापर्यंत २० हजार भारतीयांनी युक्रेन सोडलं; परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

अजुनही ऑपरेशन गंगा सुरु आहे. शेवटच्या व्यक्तीची सुटका होईपर्यंत ते सुरु राहील असंही परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं.

आतापर्यंत २० हजार भारतीयांनी युक्रेन सोडलं; परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

युक्रेनवर रशियाकडून हल्ले सुरु असून यामुळे अनेक देशांचे नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. भारतीय नागरिक विशेषत: शिकायला गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा सुरु केलं आहे. या अंतर्गत आतापर्यंत २० हजार भारतीयांनी युक्रेनची सीमा ओलांडली आहे. भारताने नागरिकांसाठी अॅडव्हायजरी जारी केल्यानंतर आतापर्यंत २० हजार भारतीयांनी युक्रेन सोडलं असल्याची माहिती देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. तसंच पुढच्या २४ तासात देशातून १६ विमाने पाठवण्यात येणार असून त्यात भारतीय हवाई दलाच्या सी १७ या एअर क्राफ्टचा समावेश असल्याचंही सांगण्यात आलं.

पूर्व युक्रेनमधील भाग या भागाला प्राधान्य देण्यात येत असून त्यात खार्किव्ह आणि पिसोचिनचा समावेश आहे. तिथे काही बसेस उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सध्या पाच बसेस असून उद्या संध्याकाळपर्यंत आणखी बसेस उपलब्ध होतील. जवळपास १ हजार भारतीय पिसोचिनमध्ये तर ७०० हून अधिक विद्यार्थी सुमीमध्ये अडकले असून सुमीतील विद्यार्थ्यांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने चिंता व्यक्त केली. युक्रेनकडे स्पेशल ट्रेन्स सुरु कऱण्याची मागणी करण्यात आली मात्र याला अद्याप सकारात्मक असा प्रतिसाद मिळू शकलेला नाही. तोपर्यंत बसेसची सोय करण्यात आली आहे असेही परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.

रशियाकडून हल्ल्यावेळी गोळीबारात हरजोत सिंग हा विद्यार्थी जखमी झाला आहे. त्याच्या उपचाराचा खर्च भारत सरकार करेल अशी माहिती देण्यात आली आहे. भारतीय दूतावासाकडून यासंदर्भात अपडेट्स घेतले जात आहेत. संघर्ष सुरु असलेल्या ठिकाणची माहिती घेण्यात अडथळे येत आहेत. शस्त्रसंधीशिवाय विद्यार्थ्यांची सुटका करणं कठीण असल्याचं दिसतंय. यासाठी किमान स्थानिक पातळीवर असे काही करता येते का याबाबत युक्रेन आणि रशियाला विनंती केल्याचंही भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं.

हेही वाचा: Ukraine : गोळीबारात जखमी भारतीय विद्यार्थाचा खर्च भारत सरकार उचलणार

अद्याप ऑपरेशन गंगा सुरु आहे. शेवटच्या व्यक्तीची सुटका होईपर्यंत ते सुरु राहील. सध्या तिथे २ ते ३ हजार नागरिक अडकले असण्याची शक्यता परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली. तसंच भारतीय नागरिकांची सुटका करत असताना एका बांगलादेशी नागरिकाला मदत करण्यात आली असून नेपाळी नागरिकांकडूनही मदतीची विनंती भारताला करण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं. भारतीयांना ओलीस ठेवण्यात आल्याच्या चर्चा होतायत मात्र अशी कोणतीही माहिती नाहीय. सुरक्षेच्या कारणामुळे खार्किव्हमध्ये कठीण परिस्थितीचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे मात्र कोणालाही ओलीस ठेवण्यात आलेलं नाही असंही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं.

Web Title: More Than 20 Thousand Indians Left Ukraine Border Says Mea

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top