हृदयाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ : तीन वर्षांच्या मुलाला खाली फेकले, आईचा होरपळून मृत्यू

सूरज यादव
Saturday, 11 July 2020

एका घराच्या तिसऱ्या मजल्यावर आग भडकली होती. तेव्हा तिथं अडकेलेल्या एका महिलेनं तिच्या मुलाला वाचवण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं. 

नई दिल्‍ली - एखाद्या अचानक ओढवलेल्या आपत्तीवेळी काय करावं हे सुचत नसतं. जिवावर बेतणारं धाडसही केलं जातं. अमेरिकेतील एका घराच्या तिसऱ्या मजल्यावर आग भडकली होती. तेव्हा तिथं अडकेलेल्या एका महिलेनं तिच्या मुलाला वाचवण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं. खाली उभा असलेल्या अमेरिकेतील एका माजी फुटबॉलपटूने मुलाला झेलून त्याचा जीव वाचवला. मात्र आईचा आगीत होरपळून मृत्यू झाला.

हे वाचा -  बोस्निया नरसंहाराला 25 वर्षे पूर्ण; 8 हजार मुस्लिमांची झाली होती हत्या

अमेरिकेतील कालामाजू सेंट्रल हायस्कूलचा माजी स्टार फुटबॉलपटू  फिलिप ब्लॅक त्याच्या मित्राच्या अपार्टमेंटमध्ये होता. तेव्हा जवळच्याच एका अपार्टमेंटला आग लागल्याचं दिसलं. त्यावेळी झालेल्या गोंधळामुळे तो बाहेर पळाला. तेव्हा बाल्कनीमध्ये एक आई तिच्या तीन वर्षांच्या मुलाला घेऊन मदत मागत असल्याचं दिसलं. खाली फिलिप दिसताच तिने मुलाला तिसऱ्या मजल्यावरूनच खाली टाकलं. तेव्हा पळत जाऊन ब्लॅकने मुलाला पकडलं. त्यानंतर मुलाला रुग्णवाहिकेतून दवाखान्यात दाखल करण्यात आलं.

मुलाला तिसऱ्या मजल्यावरून फेकल्यानंतर तो वाचला मात्र आईचा आगीत होरपळून मृत्यू झाला. फिलिप ब्लॅकने यानंतर वॉशिंग्टन पोस्टशी बोलताना म्हटलं की, या मुलाला वाचवल्यानंतर माझा दृष्टीकोन पूर्णपणे बदलला आहे. या गोष्टीनं मला जाणीव झाली की आयुष्य किती लहान आहे. आपण एकमेकांचा जीव वाचवण्याची आणि सर्व लोकांशी चांगलं वागण्याची गरज आहे. या घटनेचा आधार घेऊन मला चमकायचं नाहीय. मला त्या मुलांची मदत करायची आहे ज्यांनी या दुर्घटनेत त्यांची आई गमावली. 

हे वाचा - कोरोना वॅक्सिनचा पहिला डोस दिलेल्या महिलेनं 16 आठवड्यांनी शेअर केला अनुभव

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ही थरारक घटना दिसत आहे. तिसऱ्या मजल्यावर आगीचे लोळ पसरले आहेत. त्यातच खाली दोघेजण इमारतीजवळ येतात. त्यावेळी तिसऱ्या मजल्यावरून अचानक खाली लहान मुल फेकत असल्याचं दिसतं. हे लहान मुल जमिनीवर पडण्याआधी फुटबॉलपटू त्याला झेलतो. त्यानंतर लहान मुलाला घेऊन तो पळत जाताना दिसतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mother throw down child football star phillip blanks save from burning building