
लस तयार करताना त्यात डुकराच्या मांसामधील जिलेटीन या घटकद्रव्याचा अंश वापरला गेला आहे.
दुबई : कोरोना प्रतिबंधक लसीमध्ये डुकराच्या मांसाचा अंश असला तरी मुस्लिमांनी ती घेण्यास हरकत नाही, असा निकाल संयुक्त अरब अमिरातीमधील फतवा परिषदेने दिला आहे. फतवा परिषद ही ‘युएई’मधील सर्वोच्च इस्लामिक संस्था आहे. लस तयार करताना त्यात डुकराच्या मांसामधील जिलेटीन या घटकद्रव्याचा अंश वापरला गेला आहे. त्यामुळे लशीबाबत काही देशांमधील मुस्लिम समुदायांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, ‘इतर कोणताही पर्याय उपलब्ध नसताना मानवी शरीराच्या संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी लस घेण्यास हरकत नाही,’ असे फतवा परिषदेने म्हटले आहे.
भारत बायोटेकच्या फेज 2 च्या चाचणीचे रिझल्ट जाहीर; किती काळ ठेवते सुरक्षित?
लस तयार करताना डुकराच्या मांसापासून तयार केलेल्या जिलेटिनचा वापर केला जातो. साठवणूक आणि वाहतुकीदरम्यान लस सुरक्षित आणि परिणामकारक राहण्यासाठी हे जिलेटिन स्टॅबिलायझरची भूमिका निभावते. मुस्लिम आणि ज्यू धर्मियांमध्ये डुकराचे मांस निषिद्ध असल्याने या जिलेटीनच्या वापरावर काही गटांनी आक्षेप नोंदविला होता. त्यामुळे काही देशांमध्ये लसीकरण मोहिमेला अडथळा येण्याची शक्यता आहे.
धर्मांमधील इतर अनेक तज्ज्ञांनी आणि गटांनी लस वापरण्यास कोणतीही हरकत उपस्थित केलेली नाही. डुकराच्या मांसापासून (पोर्क) तयार केलेल्या जिलेटिनचा लसनिर्मितीमधील वापर हा अनेक वर्षांपासूनचा वादाचा मुद्दा असून अनेक कंपन्या ‘पोर्क-मुक्त’ लसीची निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वित्झर्लंडमधील नोव्हार्तीस कंपनीने मेंदूविकारावर अशी लस विकसीत केली असून सौदी अरेबियाही तसा प्रयत्न करत आहे. मात्र, अशा पद्धतीने तयार केलेली लस कमी काळ टिकते.
जम्मू-काश्मीरच्या जनतेने फुटीरतावाद्यांच्या कानशिलात लगावली; निकालानंतर भाजपची...
जिलेटीनचा वापर असलेल्या लशीचा वापर इस्लामला मान्य आहे. कारण, लस न घेतल्यास अधिक धोका आहे, असं मत सिडनी विद्यापीठचे प्राध्यापक हारुनूर रशीद यांनी व्यक्त केला. लस तोंडावाटे न देता इंजेक्शनद्वारे दिली गेल्यास धर्माचा कोणताही अडथळा नाही, असं राबाई संघटनाचे राबाई डेव्हीड स्टाव्ह म्हणाले.
दरम्यान, ऑक्टोबरमध्ये इंडोनेशियातील राजनैतिक अधिकारी आणि मुस्लिम धर्मगुरु चीनमध्ये गेले होते. राजनैतिक अधिकारी लसीचे डोस मिळविण्यासाठी गेले होते, तर धार्मिक नेते कोरोना प्रतिबंधक लस इस्लामिक कायद्याच्या नियमात बसते का, याची चाचपणी करण्यासाठी गेले होते. लस मिळविण्यासाठी सर्वच देश प्रयत्न करत असताना मुस्लिम देशांमध्ये आणि ज्यू धर्मियांमध्येही बहुतेक सर्वच लसींबाबत शंका आहेत.