
म्यानमारच्या लष्कराने देशाच्या नेता आंग सांग सू की, राष्ट्रपती यू विन मिंट यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेत सत्तापालट केला आहे.
नेपीताव Naypyitaw- म्यानमारच्या लष्कराने देशाच्या नेत्या आंग सांग सू की, राष्ट्रपती यू विन मिंट यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेत सत्तापालट केला आहे. सत्ताधारी पक्ष एनएलडीच्या प्रवक्त्याने यासंदर्भातील माहिती दिली आहे. स्थानिक माध्यमांनी माहिती दिलीये की, लष्कराने एक वर्षासाठी आणीबाणी लागू केली आहे आणि माजी जनरल आणि उपराष्ट्रपती मिंट स्वे यांना कार्यकारी राष्ट्रपती बनवण्यात आलं आहे. तसेच त्यांना सेना प्रमुखाचा दर्जा देण्यात आला आहे. रस्त्यांवर सैना तैनात करण्यात आली असून फोन आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
नोबेल शांतता पुरस्कार विजेता आंग सांग सू की यांच्या एनएलडी पक्षाने देशाच्या निवडणुकीत जोरदार विजय प्राप्त केला होता, त्यानंतर सोमवारी संसदेची बैठक होणार होती. लष्कराने या कारवाईवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. माहितीनुसार राजधानीत सैनिकांची तैनाती करण्यात आली आहे. तसचे टीव्ही चॅनेलचे प्रचारण बंद करण्यात आल्याचे कळत आहे.
दहा वर्षे आईचा मृतदेह ठेवला फ्रिझरमध्ये; कारण जाणून येईल संताप
म्यानमारमध्ये सत्तापालट होण्याची शंका व्यक्त केल्यानंतर लष्कराने रविवारी म्हटलं होतं की संविधानाचे रक्षण, पालन आणि कायद्यानुसार काम करणे आवश्यक आहे. असं म्हणत सत्तापालटाची शक्यता सैन्याने फेटाळून लावली होती. म्यानमारमध्ये 1962 साली सत्तापालट करण्यात आला होता, त्यानंतर 49 वर्षांपर्यत लष्कराचे शासन होते.
नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसीचे प्रवक्ता मायो न्यांट यांनी सांगितलं की, म्यानमारच्या काउंसलर आंग सान सू की आणि देशाच्या सत्ताधारी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना सकाळी करण्यात आलेल्या छापेमारीत ताब्यात घेण्यात आले आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी पक्षाचा दणदणीत विजय झाला होता. तेव्हापासून लष्कर देशात सत्तापालट करेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती.
म्यानमारमध्ये 8 नोव्हेंबरला झालेल्या सर्वसाधारण निवडणुकीत 'नेशनल लीग फॉर डेमोक्रॅसी'ला 476 पैकी 396 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे स्टेट काऊंसलर आंग सान सू की यांना आणखी पाच वर्ष सरकार चालवण्याची संधी मिळाली होती. लष्कराचे समर्थन असणाऱ्या 'यूनियन सॉलिडेरिटी अँड डेवलपमेंट' पक्षाने फक्त 33 जागांवर विजय मिळवला होता. लष्कराने निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप केला होता.