दोन्ही देशांचे हित एकातच : नरेंद्र मोदी

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

दोन्ही देशांचे हित एकातच आहे. रस्ते आणि पूल निर्मिती क्षेत्रात उभयतांचे उज्ज्वल भवितव्य आहे. भारतातून म्यानमारसाठी हायस्पीड डिझेल ट्रकची आयात सुरू झाली असून, म्यानमारच्या आरोग्य क्षेत्रातही मदत सुरूच आहे. भविष्यातील प्रकल्प हे म्यानमारची गरज ओळखून निश्‍चित केले जातील. म्यानमारच्या ज्या नागरिकांना भारतात यावेसे वाटते, त्यांना ग्रेटिस व्हिसा दिला जाईल. तसेच, भारतात तुरुंगात असलेल्या म्यानमारच्या 40 नागरिकांना सोडून देण्याचा निर्णय घेतला असून, ते लवकरच कुटुंबाची भेट घेऊ शकतील.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

पंतप्रधानांचा म्यानमार दौरा; कोणतेही प्रश्‍न एकत्रपणे निकाली काढू

न्या पी तौ: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्टेट कौन्सिलर आंग सान सू की यांच्यात झालेल्या चर्चेत रोहिंग्यांच्या स्थलांतराच्या मुद्द्यावरून चिंता व्यक्त करण्यात आली. शेजारी राष्ट्र असल्याने दोघांचे हित एकातच सामावलेले आहे, एकत्र येऊन भविष्यातील प्रश्‍नांचा सामना केला जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी आश्‍वासन दिले. या दरम्यान भारत आणि म्यानमार यांच्यात सांस्कृतिक, व्यापारी पातळीवर संबंध दृढ करणारे करार करण्यात आले. दरम्यान, काल (मंगळवारी) पंतप्रधान मोदी यांचे म्यानमार येथे जोरदार स्वागत झाले.

मोदी आणि आंग सान सू की यांच्या चर्चेनंतर संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. त्यात मोदी यांनी शांतता प्रस्थापित करण्याबाबत आंग सान सू की यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. ते म्हणाले, की म्यानमारच्या शांतता प्रक्रियेतील आपले साहसी नेतृत्व प्रशंसनीय आहे. म्यानमारची सध्याची आव्हाने ठाऊक आहेत. रोहिंग्यांचा थेट उल्लेख टाळत शेजारी देश असल्याने सुरक्षेसंदर्भातील आपली चिंता सारखीच आहे, असे नमूद करून प्रश्‍नांवर तोडगा काढण्यासाठी एकत्रपणे काम करू, असे स्पष्ट केले. त्याचवेळी स्टेट कौन्सिलर आंग सान सू की यांनी दहशतवाद्यांना म्यानमारमध्ये थारा मिळणार नाही यासाठी प्रयत्नशील राहू, असे सांगितले.

रोहिंग्या मुस्लिमांच्या मुद्द्यावरून भारतही चिंतेत असून, त्यांना मायदेशी पाठवण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. सुमारे 40 हजार रोहिंग्या मुस्लिम भारतात बेकायदेशीररीत्या राहत आहेत.

भारत- म्यानमार यांच्यातील करार
पंतप्रधान मोदी आणि आंग सान सू की यांच्या चर्चेनंतर केलेल्या करारात भारत आणि म्यानमार यांच्यात 2017 ते 2020 या काळात सांस्कृतिक देवाण-घेवाण उपक्रम राबवण्यात येणार आहे. तसेच, म्यानमार प्रेस कौन्सिल अँड प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया यांच्यात सहकार्य वाढवणे, कौशल्य विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत आणि म्यानमार यांच्यात केंद्र स्थापन करणे, आरोग्य आणि आरोग्य सेवा देवाण-घेवाण या मुद्द्यावर करार झाले. तसेच, दोन्ही देशांनी यामेंथिन येथे महिला पोलिस प्रशिक्षण केंद्राला आधुनिक करण्याबाबत करार केला.

मोदींचे जोरदार स्वागत
काल म्यानमार येथे मोदी यांचे जोरदार स्वागत झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचे फोटो परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्विट करून शेअर केले आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदी आणि म्यानमारचे अध्यक्ष हितीन क्‍याव यांच्यात बैठक झाली. या वेळी पंतप्रधानांनी क्‍याव यांना तिबेटहून अंदमानच्या सागरापर्यंत वाहणाऱ्या साल्विन नदीचा 1841 चा नकाशा आणि बोधिवृक्षाची मूर्ती भेट दिली. मोदी हे दोन देशांच्या दौऱ्यादरम्यान दुसऱ्या टप्प्यात चीनच्या शियामिन येथून म्यानमारला पोचले आहेत. मोदींचा हा पहिलाच द्विपक्षीय दौरा आहे. यापूर्वी 2014 मध्ये असियान- भारत शिखर परिषदेसाठी ते येथे आले होते.

Web Title: myanmar news india narendra modi and myanmar