वाळवंटात सापडलेला रहस्यमयी खांब गायब; एलियन्सनी पळवल्याची चर्चा

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 30 November 2020

अमेरिकेत यूटाच्या दक्षिणेतील वाळवंटात दोन आठवड्यांपूर्वी सापडलेला धातूचा खांब अचानकपणे गायब झाला आहे

वॉशिंग्टन- अमेरिकेत यूटाच्या दक्षिणेतील वाळवंटात दोन आठवड्यांपूर्वी सापडलेला धातूचा खांब अचानकपणे गायब झाला आहे. एका राज्य टीमला 18 नोव्हेंबर रोजी हेलिकॉप्टरमधून एक वस्तू दिसली होती. ही वस्तू एका व्यक्तीच्या उंचीपेक्षा दुप्पट उंचीची होती. हा धातूचा खांब सर्वसाधारण धातूपेक्षा वेगळा होता आणि तो वाळवंटात सापडल्याने जगभरात चर्चा सुरु झाली होती. फेडरल ब्यूरो ऑफ लँड मॅनेजमेंट किंवा स्टेट डिपार्टमेंट ऑफ पब्लिक सेफ्टीकडे हा खांब गायब झाल्यासंबंधी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. 

राज्य एजेंसीने शनिवारी आपल्या वेबसाईटवर एक पोस्ट केली होती. आम्हाला रिपोर्ट मिळाली आहे की, अवैधरित्या ठेवण्यात आलेल्या स्ट्रक्चरला कोणत्यातरी अज्ञात पार्टीने हटवले आहे, असं या पोस्टमध्ये म्हणण्यात आलं होतं. हा खांब शुक्रवारी गायब झाल्याचे सांगण्यात येत आहे. याविषयी कोणत्याही प्रतिनिधीने प्रतिक्रिया दिलेली नाही. विशेष म्हणजे ज्या प्रकारे या ठिकाणी हा धातूचा खांब दिसला होता, त्याचप्रमाणे तो आता गायब झाला आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये कुतुहल वाढले आहे. 

खुशखबर! Ola-Uber ने प्रवास करणाऱ्यांना सरकारने दिलं गिफ्ट; नियमांत बदल

वाळंवटात एक असाधारण वस्तू दिसल्याची बातमी परिसरात वेगाने पसरली. त्यानंतर पर्यटकांचे येथे येणे वाढले आहे. राज्य सरकारकडून या जागेचे अचूक ठिकाण जाहीर केलेले नाही. अनेकांनी ही वस्तू कोणत्यातरी कलाकाराने येथे ठेवल्याचा दावा केला आहे. 1968 च्या A Space Odyssey या एलियन चित्रपटामध्ये अशीच वस्तू दाखवण्यात आली होती. 

काही लोकांच्या म्हणण्यानुसार हा असाधारण धातूचा खांब जॉन मॅकक्रॅकन यांनी लावला आहे. जॉन यांचा मृत्यू झाला आहे आणि त्यांनी त्यांच्या मुलाला 2002 मध्ये सांगितले होते की त्यांनी आपल्या कलाकृती दूर ठिकाणी सोडल्या आहेत. ज्या कधीतरी लोकांना सापडतील. दरम्यान, धातूचा खांब वाळवंटात सापडण्यामागचे कारण कोणतेही असो, पण ही वस्तू दिसने आणि त्यांनंतर ती गायब होणे यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mysterious shiny monolith found in otherworldly Utah desert