...अन् 328 दिवसांनी ख्रिस्तीना परतली पृथ्वीवर; अंतराळात राहण्याचा विक्रम!

Christina-Koch
Christina-Koch

अलमटी (कझाकिस्तान) : दीर्घकाळ अंतराळात राहणारी महिला, असा विक्रम अमेरिकेची अंतराळवीर ख्रिस्तीना कोच हिने आज केला. तब्बल 328 दिवस आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात राहून ती आज सुखरूपपणे पृथ्वीवर परतली. 

कझाकिस्तानच्या डझहेजझगन स्थानकावर गुरुवारी स्थानिक वेळेसुनार पहाटे 4.12 वाजता ख्रिस्तीना परतली. या वेळी तिच्या समवेत रशियाचे सोयूझ कमांडर अलेक्‍झांडर स्काव्होत्सोव (रशिया) आणि युरोपचे अंतराळवीर लुका पारमिटनो होते. हे दोघे 201 दिवस अंतराळात होते. ते दोघे गेल्या वर्षी जुलैत नासाचे अँड्य्रू मॉर्गन यांच्यासमवेत गेले होते. मॉर्गन हे 17 एप्रिलला पृथ्वीवर परतणार आहेत.

ख्रिस्तीनाने अंतराळात 328 दिवस व्यतीत करण्याबरोबरच पृथ्वीला तिने 5,248 वेळेस प्रदक्षिणा घातल्या आहेत. यासाठी तिने 3.9 कोटी किलोमीटरचे अंतर पार केले. हे अंतर पृथ्वी ते चंद्र यांच्यामध्ये 291 फेऱ्या मारण्याएवढे आहे. गेल्या 11 महिन्यांत तिने 6 वेळा 'स्पेस वॉक' केले. स्पेस वॉकच्या वेळी ती एकूण 42 तास 15 मिनिटे स्थानकाबाहेर होती, अशी माहिती 'नासा'ने दिली आहे. 

अंतराळ स्थानकातील आपल्या वास्तव्यादरम्यान तिने अनेक शास्त्रीय प्रयोग केले. ख्रिस्तीनाच्या मोहिमेचा मुख्य उद्देश भविष्यातील चंद्र आणि मंगळ अभियानाबरोबरच गुरुत्वाकर्षण आणि अवकाशातील किरणोत्सर्गाचा महिलांच्या शरीरावर पडणारा प्रभाव, याचा अभ्यास करणे हा होता. भविष्यात चंद्रावर अंतराळ स्थानक स्थापन करण्याचे 'नासा'चे ध्येय असून, त्यासाठी ख्रिस्तीना आणि तिच्या सहकाऱ्यांनी केलेले अध्ययन उपयुक्त ठरणार आहे. 

ख्रिस्तीना कोच यांना 14 मार्च 2019 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठविण्यात आले होते. ही मोहीम केवळ सहा महिन्यांची होती. मात्र, नासाने या मोहिमेला मुदतवाढ दिली. अंतराळात राहून काम करणे, हा माझ्यासाठी मोठा सन्मान असल्याचे ख्रिस्तीना म्हणते.

ख्रिस्तीनाची 'नासा'साठी 2013 मध्ये निवड झाली होती. 2015 रोजी तिने अंतराळवीरचे प्रशिक्षण पूर्ण केले. ख्रिस्तीनाने नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटी येथून इलेक्‍ट्रिकल इंजिनिअरची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून, तिचा जन्म अमेरिकेतील मिशिगन येथील आहे. ख्रिस्तीनाला योगा करणे, सर्फिंग, पॅडलिंग, गिर्यारोहण, धावणे, समाजसेवा, फोटोग्राफी आणि फिरण्याची आवड आहे. 

दिवसात अनेक सूर्योदय 

ख्रिस्तीनाने अंतराळात 328 दिवस घालवले असून, तेथे एका दिवसात 1440 मिनिटे होतात. ख्रिस्तीना दर 90 मिनिटाला सूर्योदय पाहत होती. कारण, अंतराळ स्थानक फिरताना पृथ्वीच्या दुसऱ्या भागात जाते. या हिशेबाने ख्रिस्तीनाने दररोज 16 वेळेस सूर्योदय पाहिले आहेत. म्हणजेच, आत्तापर्यंत तिने 328 दिवसांत पाच हजारांहून अधिक वेळा उगवत्या सूर्याचे दर्शन घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com