सूर्यापेक्षाही प्राचीन पदार्थाचा लागला शोध; शास्त्रज्ञांचा दावा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 January 2020

  • शास्त्रज्ञांना पृथ्वीवर असा पदार्थ सापडला आहे, की जो आपल्या सूर्यापेक्षाही काही अब्ज वर्षांनी जुना आहे.

वॉशिंग्टन : आपल्या सूर्यमालेतील सर्व ग्रहांची निर्मिती सूर्यापासून झाल्याचा सिद्धांत खगोलशास्त्रज्ञ मांडतात. पण, शास्त्रज्ञांना पृथ्वीवर असा पदार्थ सापडला आहे, की जो आपल्या सूर्यापेक्षाही काही अब्ज वर्षांनी जुना आहे. ऑस्ट्रेलियामध्ये पन्नास वर्षांपूर्वी उल्कापातात मिळालेल्या "स्टारडस्ट'मधील हा पदार्थ सुमारे साडेपाच अब्ज वर्षांपूर्वी असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सूर्यमालानिर्मितीच्या आजवर सिद्धांतावर या संशोधनामुळे नवा प्रकाश पडणार आहे. अमेरिकेच्या नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्सेसच्या (पीएएनएस) शोधपत्रिकेत यासंबंधीचा शोधनिबंध नुकताच प्रकाशित झाला आहे. तारानिर्मितीच्या सुरुवातीच्या काळातील ही "स्टारडस्ट' एकसारख्या वेगाने, स्थिर पद्धतीत ताऱ्यामध्ये निर्मिती झाल्याचे संशोधनातून पुढे आले आहे. शिकागो विद्यापीठाचे सहायक प्राध्यापक आणि फिल्ड संग्रहालयाचे संस्थापक डॉ. फिलिप्स हिक म्हणतात, "आजपर्यंत सापडलेला सर्वांत प्राचीन असलेला हा पदार्थ आपल्या आकाशगंगेतील तारानिर्मितीच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकेल. सूर्यनिर्मितीपूर्वी अस्तित्वात असलेले "प्रीसोलार ग्रेन' या पदार्थात सापडले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ही "स्टारडस्ट' अतिप्राचीन आहे.'' अमेरिकेच्या फिल्ड संग्रहालयात हा पदार्थ संग्रहित ठेवण्यात आला आहे.

छपाक चित्रपटाचा परिणाम; उत्तराखंड सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

उल्केच्या पोटात सुरक्षित "स्टारडस्ट'
- तारानिर्मितीच्या वेळेची ही स्टारडस्ट "उल्के'च्या पोटात.
- उल्केच्या अंतर्भागात असल्यामुळे कोट्यवधी वर्षांपासून सुरक्षित, कोणत्याही ब्रह्मांडीय घटकांचा परिणाम नाही
- उल्केच्या एकूण वजनाच्या पाच टक्के असलेल्या "स्टारडस्ट'मध्ये सापडले "प्रीसोलार ग्रेन'
- हे "प्रीसोलार ग्रेन' कोणत्या प्रकारच्या ताऱ्यातील आहे, याचा शोध घेण्यात आला.
- वैश्‍विक किरणांच्या साह्याने स्टारडस्टचे वय निश्‍चित करण्यात आले.
- 4.6 ते 5.5 अब्ज वर्षांचे प्रीसोलार ग्रेन या स्टारडस्टमध्ये सापडले.
- सूर्याचे वय 4.6 अब्ज वर्षे आणि पृथ्वीचे वय 4.5 अब्ज वर्षे आहे.

"प्रीसोलार ग्रेनचे वय काढून हे संशोधन थांबणार नाही. ताऱ्यांच्या निर्मितीचा इतिहास अशा प्रकारच्या दुर्मीळ स्टारडस्टमुळे उलगडणार आहे. कारण, तारा मृत पावल्यानंतरच अशा प्रकारची स्टारडस्ट बाहेर पडते. ब्रह्मांडात सात अब्ज वर्षांपूर्वी तारानिर्मितीची आलेली लाट या संशोधनामुळे उलगडणार आहे.''- प्रा. फिलिप्स हिक, शिकागो विद्यापीठ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nearly Seven-Billion-Year-Old Real Stardust Found Say Scientists