
Land Slide In Nepal : भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये मोठा अपघात झाल्याचे वृत्त आहे. पश्चिम नेपाळच्या अछाम जिल्ह्यात विविध ठिकाणी भूस्खलनामुळे किमान 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 10 नागरिक अद्यापही बेपत्ता असून 10 जणांना वाचवण्यात यश आले आहे,अशी माहिती उपमुख्य जिल्हाधिकारी दीपेश रिजाळ यांनी दिली आहे. सध्या घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, गृहमंत्र्यांनी शोध आणि बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टर तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.
नेपाळमध्ये संततधार पावसाचा फटका बसला असून, त्यामुळे पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडून अपघात घडत आहेत. नेपाळमधील दारचुला जिल्ह्यातील बांगबागड परिसरात गेल्या शनिवारी पूर आणि भूस्खलनात किमान दोन जण ठार झाले होते, तर 11 जण बेपत्ता झाले होते. संततधार पावसामुळे लस्कू आणि महाकाली नद्यांना पूर आला असून, ज्यामुळे घरे आणि दोन पूल वाहून गेले. नेपाळमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पूर आणि भूस्खलनाच्या आपत्तींमुळे अनेक बळींची नोंद होत आहे.