"भगवान रामाचा जन्म नेपाळमधील अयोध्यापुरीतला; येथे भव्य राम मंदिर उभारु"

वृत्तसंस्था
Sunday, 9 August 2020

नेपाळचे पंतप्रधान केपी. शर्मा ओली यांनी पुन्हा एकदा राम मंदिर जन्मस्थान प्रकरणी वाद निर्माण करणारे वक्तव्य केलं आहे.

काटमांडू- नेपाळचे पंतप्रधान केपी. शर्मा ओली यांनी पुन्हा एकदा राम मंदिर जन्मस्थान प्रकरणी वाद निर्माण करणारे वक्तव्य केलं आहे. भगवान रामाचा जन्म नेपाळमधील माडी येथे झाला असल्याचं म्हणत ओली यांनी राम मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी स्थानिक नेत्यांना यासंदर्भातील योजना तयार करण्यास सांगितलं आहे.  विशेष म्हणजे 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन केले आहे. 

माडीमध्ये झाला भगवान रामाचा जन्म

चितवनच्या माडीमधील अधिकाऱ्यांना ओली यांनी शनिवारी फोन करुन बोलावलं होतं. दोन तास चर्चा केल्यानंतर ओली यांनी अधिकाऱ्यांना राम मंदिर बनवण्यासंबंधी योजना तयार करण्यास सांगितलं आहे. ओली यांनी रामाचा जन्म नेपाळमधील अयोध्यापुरी येथे झाल्याचा दावा केला आहे. शिवाय त्यांनी स्थानिक लोकांना ऐतिहासिक पुराव्यांचे संरक्षण करण्यास सांगितलं आहे. तसेच अधिकचे पुरावे गोळा करण्यासाठी अयोध्यापुरीमध्ये खोदकाम करण्याचे निर्देश दिले आहेत. 

अयोध्यापुरी हेच रामाचे जन्मस्थान आहे. येथे भव्य असे राम मंदिर बनवायला हवं. ओली यांनी माडीचे नाव अयोध्यापुरी करण्यासही सांगितलं आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या सल्ल्यानुसार याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. अयोध्येपुरीचा ऐतिहासिक आणि धार्मिक क्षेत्र म्हणून विकास करण्यासाठी जमीन देण्याचे आश्वासनही ओली यांनी दिलं आहे. त्यांनी राम, लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्ती बनवण्यासही सांगितलं आहे.

ओली यांच्या या निर्णयाला माडी वासीयांनी विरोध केल्याचं दिसत आहे. आधी पायाभूत सुविधांचा विकास करा, त्यानंतरच राम मंदिर बांधण्याचा विचार करा, असं स्थानिक चेपांग समुदायाने म्हटलं आहे. 

भारतात नकली अयोध्या असल्याचा दावा

भारताने सांस्कृतिक अतिक्रमण करण्यासाठी नकली अयोध्येचे निर्माण केला असल्याचा दावा ओली यांनी मागील महिन्यात केला होता. नेपाळमध्ये खरी अयोध्या आहे. भारताची अयोध्या खरी असली तर राजकुमार लग्नासाठी जनकपुर येथे कसे येऊ शकतात. विज्ञान आणि ज्ञानाची उत्पत्ती नेपाळमध्ये झाली आहे, असं ओली म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन भारतीयांनी त्यांच्यावर टीका केली होती. 
(edited by-kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nepal pm kp oli sharma oli direct to build ram mandir