
सर्वेक्षणानुसार, कोरोनाच्या तिसऱ्या लॉकडाऊनच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये रुग्णांची संख्या घटल्याचा कोणताही पुरावा सापडलेला नाही. त्याउलट या काळात लागण होण्याचं प्रमाण वाढल्याचं दिसत आहे.
लंडन : कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळं युरोपीय देश आणि अमेरिका चिंतेत आहे. स्ट्रेनचा फैलाव रोखण्यासाठी ब्रिटनने पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. पण, या लॉकडाऊनचा फारसा फायदा झालेला दिसत नाही. ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णांच्या वाढीचे प्रमाण घटलेले नाही. त्याचवेळी कोरोनामुळं मृ्त्यू झालेल्यांचा आकडा धडकी भरवणारा आहे. गेल्या बुधवारी ब्रिटनमध्ये एका दिवसात 1800 जणांचा बळी गेला आहे.
ब्रिटनने जगात पहिल्यांदा कोरोना लसीकरणाला सुरुवात केली. देशात लसीकरणाला वेग आला असला तरी, लस दिल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या शरिरात रोग प्रतिकारक शक्ती तयार होण्यासाठी जवळपास दीड महिन्याचा कालावधी लागतो. त्यामुळे लसीकरण आणि नव्या स्ट्रेनचा फैलाव यात मोठे अंतर दिसत आहे. ब्रिटनमध्ये नव्यानं लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असली तरी, त्याचा चांगली परिणाम अद्याप दिसलेला नाही. लॉकडाऊनने कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होण्या ऐवजी ती वाढण्याचा धोका वर्तवण्यात आलाय.
आणखी वाचा - आत्मविश्वास पाहा, 89 वर्षांची आजी कार चालवते
ब्रिटनमधील इम्पिरियल कॉलेजने केलेल्या सर्वेक्षणानुसार, कोरोनाच्या तिसऱ्या लॉकडाऊनच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये रुग्णांची संख्या घटल्याचा कोणताही पुरावा सापडलेला नाही. त्याउलट या काळात लागण होण्याचं प्रमाण वाढल्याचं दिसत आहे. या सर्वेक्षणाचे प्रोग्राम डायरेक्टर, पॉल इलिओट म्हणाले, 'आमच्या डेटामधून आलेले निष्कर्ष चिंता करायला लावणारे आहेत. या डेटावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत.'
कॉलेजने 6 ते 15 जानेवारी दरम्यान केलेल्या सर्वेक्षणानुसार त्या काळात 63 मधील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला केलेल्या सर्वेक्षणाच्या तुलनेत लागण होण्याचं प्रमाण वाढल्याचं स्पष्ट झालंय. जोपर्यंत ब्रिटनमधील कोरोनाचा फैलाव आटोक्यात येत नाही तोपर्यंत स्थानिक आरोग्य यंत्रणेवर प्रचंड दबाव राहील आणि मृतांचे प्रमाण वाढतच राहील, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
आणखी वाचा - चला येरवडा जेलमध्ये, होय, तुम्हीही जाऊ शकता
कोरोनाचा नवा स्ट्रेन पहिल्यांदा लंडनमध्ये आणि अग्नेय इंग्लंड परिसरात सापडल्याचे पुरावे मिळाले आहेत. संशोधकांकडून आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, स्ट्रेनचा फैलाव वेगाने होईल आणि मृत्यू दरही जास्त असेल.
-बोरीस जॉन्सन, पंतप्रधान, ब्रिटन