उत्तर कोरियाची समजूत काढा: डोनाल्ड ट्रम्प

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 नोव्हेंबर 2017

भडकलेल्या अमेरिकेचे चीनला आवाहन; उद्धवस्त करण्याचा इशारा

भडकलेल्या अमेरिकेचे चीनला आवाहन; उद्धवस्त करण्याचा इशारा

न्यूयॉर्क : उत्तर कोरियाच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणीने भडकलेल्या अमेरिकेने आज संयुक्त राष्ट्रसंघाला उत्तर कोरियाविरुद्ध निर्बंध आणखी कडक करण्याचे आवाहन केले आहे. क्षेपणास्त्र चाचणीतून उत्तर कोरियाचे अध्यक्ष हुकूमशहा किम जोंग ऊन हे जगाला वेगाने युद्धाच्या दिशेने नेत असून, उत्तर कोरियाशी संबंध ठेवणाऱ्या राष्ट्रांनी त्यांच्याशी नाते तोडून टाकावेत, असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. त्याचबरोबर चीनचे अध्यक्ष शी जिनिपिंग यांना उत्तर कोरियाची समजूत काढण्याचे आवाहन केले आहे. जर उत्तर कोरियाचा हेकेखोरपणा असाच कायम राहिला तर अमेरिका उद्‌द्‌धस्त करेल, अशा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.

उत्तर कोरियाच्या चाचणीच्या पार्श्‍वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने बोलावलेल्या आपत्कालीन बैठकीत प्रतिनिधी निकी हॅले यांनी अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली. उत्तर कोरियाबरोबर सर्वच देशांनी राजनैतिक संबंध तात्काळ तोडावेत, असे आवाहन केले. हेली म्हणाल्या की, उत्तर कोरियाकडून होणारी सतत अणुचाचणी पाहता त्यांना एकटे पाडणे ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे सर्वच देशांनी उत्तर कोरियाशी नाते तोडून टाकावेत. तांत्रिक, लष्करी, संशोधन, व्यापार या सर्वच पातळीवर उत्तर कोरियाशी संबंध तोडावेत. उत्तर कोरियातून आयात आणि निर्यात बंद करावी आणि उत्तर कोरियांच्या कर्मचाऱ्यांची देशातून हकालपट्टी करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. हॅले म्हणाल्या की, उत्तर कोरियाच्या अणुचाचण्या तेलाच्या जिवावर सुरू आहेत. निर्बंधांच्या आधारावर 90 टक्के व्यापार आणि 30 टक्के कच्च्या तेलांवर बंदी घालण्यात यश आले आहे. तरीही अजून कच्चे तेल बाकी आहे. कच्च्या तेलाचा मोठा भाग उत्तर कोरियाला चीनकडून मिळतो. 2003 मध्ये चीनने उत्तर कोरियाला कच्चे तेल देण्याचे थांबवले होते. त्यामुळे उत्तर कोरिया चर्चेसाठी तयार झाला. आताही चीनकडून सहकार्य मिळणे अपेक्षित आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे.

ट्रम्प-शी जिनिंपिंग यांची चर्चा
ट्रम्प यांनी चीनच्या अध्यक्षांशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती हॅले यांनी दिली. या चर्चेवरून असे वाटते की उत्तर कोरियाला कच्चे तेल देण्याचे चीनला थांबवावे लागेल. जर यात चीन यशस्वी ठरला तर, आंतरराष्ट्रीय संकटाचा सामना करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात हे एक मोठे पाऊल असेल.

किम जोंग युद्धाच्या मार्गावर
उत्तर कोरियाच्या हुकूमशहाने निवडलेला मार्ग हा युद्धाकडे जातो. अमेरिकेला युद्ध नको आहे. मात्र, युद्धाची वेळ आली तर त्यामागे उत्तर कोरिया असेल. युद्ध झालेच तर उत्तर कोरियाचे सरकार पूर्णपणे नष्ट केले जाईल, यात कोणतीही शंका नाही, असेही अमेरिकेने म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new york news north korea china and donald trump