दहशतवादी समजून निर्वासितांच्या कॅम्पवर बाँबफेक; 100 ठार

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जानेवारी 2017

नायजेरियाच्या लष्कराने ही चूक मान्य केली आहे. मृतांची संख्या शंभरहून अधिक असण्याची शक्‍यता असून, दोनशेहून अधिक जखमी झाले आहेत.

मैदुगुरी (नायजेरिया) - नायजेरिया हवाई दलाच्या जेट विमानाने मंगळवारी बोको हरामचे दहशतवादी समजून चुकून स्थलांतरीत आणि बचाव पथकावरच बाँबफेक केल्याने शंभरहून अधिक निर्वासित मृत्युमुखी पडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

कॅमेरून देशाला लागून असलेल्या सीमेनजीक ही घटना घडली. बोको हराम या दहशतवादी संघटनेचे सदस्य या भागात जमणार असल्याचे समजल्याने येथे हल्ला करण्यासाठी हवाई दलाची मोहीम सुरू होती. मात्र, एका विमानाने निर्वासित छावणीवरच चुकून बाँबहल्ले केले. यामुळे निर्वासितांबरोबरच अनेक डॉक्‍टर आणि रेड क्रॉस या संघटनेच्या स्वयंसेवकही मृत्युमुखी पडले आणि अनेक जण जखमीही झाले. 

नायजेरियाच्या लष्कराने ही चूक मान्य केली आहे. मृतांची संख्या शंभरहून अधिक असण्याची शक्‍यता असून, दोनशेहून अधिक जखमी झाले आहेत. नायजेरियाच्या लष्कराकडून अशा प्रकरची चूक प्रथमच झाली असून, रण गावाजवळ ही घटना घडल्याचे, लष्कराचे कमांडर मेजर जनरल लकी इराबोर यांनी सांगितले. बोको हराम या दहशतवादी संघटनेचा बिमोड करण्यासाठी नायजेरियन लष्कराकडून हल्ले करण्यात येत आहेत.

Web Title: Nigerian air force bombs refugee camp, more than 100 dead