भारताकडे प्रत्यार्पण केल्यास आत्महत्या करू : नीरव मोदी

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

नीरव हा सात महिन्यांपासून लंडनमधील वांड्‌सवर्थ तुरुंगात आहे. लंडन पोलिसांनी त्याला 19 मार्च रोजी अटक केली होती. वेस्टमिनिस्टर न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात जामीनअर्जावरील सुनावणीसाठी नीरव बुधवारी हजर होता. 

लंडन : पंजाब नॅशनल बॅंक गैरव्यवहार प्रकरणातील फरार असलेला आरोपी व हिरे व्यापारी नीरव मोदी याने नव्याने दाखल केलेला जामीनअर्ज ब्रिटनमधील न्यायालयाने आज फेटाळून लावला. न्यायालयाने नीरवला आत्तापर्यंत पाच वेळा जामीन नाकारला आहे. यावेळी नीरव मोदीने न्यायालयासमोर पोकळ धमकी देत जर भारताकडे आपलं प्रत्यार्पण केलं तर आपण आत्महत्या करू असे म्हटले आहे. आपल्याला तरूंगात अन्य कैद्यांकडून मारहाणदेखील करण्यात आल्याचेही त्याने म्हटले आहे.

नीरवच्या वकिलांनी नव्याने दाखल केलेल्या जामीनअर्जावर येथील न्यायालयात सुनावणी झाली. नीरव हा अस्वस्थता आणि निराशेने ग्रासला असल्याने त्याला जामीन मंजूर करावा, अशी विनंती नीरवच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली. मात्र, नीरवला जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला. 

नीरव हा सात महिन्यांपासून लंडनमधील वांड्‌सवर्थ तुरुंगात आहे. लंडन पोलिसांनी त्याला 19 मार्च रोजी अटक केली होती. वेस्टमिनिस्टर न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात जामीनअर्जावरील सुनावणीसाठी नीरव बुधवारी हजर होता. 

पंजाब नॅशनल बॅंक गैरव्यवहारप्रकरणी नीरवचे प्रत्यार्पण करण्याची मागणी भारताने ब्रिटनकडे केली आहे. त्यानंतर लंडन पोलिसांनी नीरवला अटक केली होती. नीरवने भारताकडे प्रत्यार्पणाच्या कारवाईला आव्हान दिले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nirav Modi denied bail for a third time, to remain in unliveable UK jail