ॲलेक्सिस कॅरेल: 'शल्यचिकित्से’चा चेहरामोहरा बदलून टाकणारा संशोधक

ॲलेक्सिस कॅरेल: 'शल्यचिकित्से’चा चेहरामोहरा बदलून टाकणारा संशोधक

‘उडदामाजी काळेगोरे’ सगळीकडंच असतात तसं विज्ञानविश्वातही विविधरंगी-विविधढंगी माणसं होऊन गेली.. आयुष्यभर आनंदी सकारात्मक प्रयोगशील डाॅक्टर (Doctor )रक्स इथं होते तसे आयुष्याच्या मावळतीला उपरती झालेले उद्यमशील संशोधक महाशय अल्फ्रेड नोबेलही Nobel इथंच होते.. शेवटी ही सारी आपल्या सारखीच हाडामांसाची माणसं..

त्यांच्या मुलभूत मानवतावादी चिंतनामुळं किंवा निरंतर अथक प्रयोगशीलतेमुळं ती चारचौघांपेक्षा वेगळी आणि लोकोत्तर ठरली एवढंच..आज अश्याच एका एका वेगळ्या वल्लीची गोष्ट सांगतो.. त्याचा जन्म फ्रान्समध्ये एका व्यापारी कुटूंबात झाला.. लहान वयातच त्याचं पितृछत्र हरपलं.. त्याच्या आईनं त्याचं प्राथमिक शिक्षण घरीच दिलं अन् उरलेलं शहरातल्या सेंट जोसेफमध्ये पुर्ण झालं.. इकडं आपण शिक्षण संपवूनही आर्ट-काॅमर्स-सायन्स शाब्दिक खेळ खेळत बसतो तिकडं यानं शालेय शिक्षण संपल्यावर लिओन विद्यापीठात भाषेत पदवी घेतली, त्याचा पुढच्या वर्षी विज्ञान शाखेत पदवी मिळवली आणि त्याच्या पुढच्याच वर्षी पुन्हा त्याच विद्यापीठात वैद्यकिय शाखेला प्रवेशही घेतला.. तेही शिक्षण त्यानं चटकन पुर्ण केलं आणि तिथंच लिओन हाॅस्पिटलही जाॅईन केलं.. तिथं तो शरीररचनाशास्त्र आणि शल्यचिकित्सा हे दोन विषय शिकवू लागला.. त्यानं या संस्थेत अनेक पदं भुषवली आणि शल्यचिकित्सा या विषयात तो तिथला अगदी ‘बाॅस’ झाला..

दोन वर्षे तगडा अनुभव मिळाल्यानंतर त्यानं आपला मुक्काम अमेरिकेतल्या शिकागोत हलवला.. इथं मात्र त्यानं शरीरक्रियाशास्त्र हा विषय निवडत संबंधित विभागात काम सुरू केलं.. काही दिवस सहाय्यक आणि लवकरच स्थायी सदस्यपद मिळवत तो तिथल्या राॅकफेलर वैद्यकिय संशोधन संस्थेतला महत्वाचा घटक झाला.. इथं त्यानं चिक्कार प्रयोग केले-अथक काम केलं.. पहिल्या महायुद्धकाळात त्यानं फ्रेंच सैन्यात ‘मेजर’ हे पदही भुषवलं.. अन् इथंच त्याच्या जखम, विशेषत: तुटलेली रक्तवाहिनी शिवायच्या जगप्रसिद्ध उपचारपद्धतीचा विकासही झाला.. युद्धकाळात ही पद्धती प्रचंड लोकप्रिय आणि प्रभावी ठरली एवढंच नाही तर युद्धापश्चातही टिकून राहिली.. त्याचं संशोधन हे नेहमी प्रायोगिक शल्यचिकित्सा-त्वचारोपण अश्या गोष्टींभोवती फिरणारं राहिलं.. लवकरच त्यानं तुटलेल्या रक्तवाहिन्या जोडण्याचं तंत्र अधिक पाॅलिश केलं अन् अवयव प्रत्यारोपणाविषयीही मुलभूत चिंतन आणि लेखन करून ठेवलं.. यानंतर त्यानं चार्ल्स लिंडबर्ग-जाॅर्जेस डेबेली-थिओडेर टफिएर अश्या महानुभावांसोबत काम करत शल्यचिकित्सेतील अनेक तंत्र विकसित केले.. युएसए, स्पेन, रशिया, स्वीडन, नेदरलॅंड, बेल्जियम,फ्रान्स, व्हॅटिकन सिटी, जर्मनी, इटली, ग्रीस अश्या अनेक देशातली विद्यापीठांनी त्याचा गौरव केला.. अनेक देशातले सर्वोच्च नागरी पुरस्कारांचाही तो मानकरी ठरला.. सर्वार्थानं प्रचंड यशस्वी असलेल्या त्यानं एका विधवेशी विवाह केला होता पण दुसऱ्या महायुद्धकाळात त्यांचं वैवाहिक आयुष्य संपुष्टात आलं.. तो मायदेशी परतला अन् फ्रेंच आरोग्य मंत्रालयात त्याची खास नेमणूक करण्यात आली.. रुढार्थानं प्रचंड यशस्वी आयुष्य तो जगला..रक्तवाहिन्या शिवण्याच्या त्याच्या अमुलाग्र तंत्रामुळं त्यानं ‘शल्यचिकित्सा’ या विषयाचा चेहरामोहराच बदलवून टाकला.. या क्षेत्रात थेट ‘नोबेल’ मिळवणाऱ्या मोजक्या पाच लोकांमधील तो एक ठरला.. त्यानं अनेक अभिनव पद्धती विकसित केल्या पण विद्यार्थी तयार केले नाही.. त्याचं शस्रागार आणि कपडे तो संकेताच्या उलट म्हणजे काळ्या रंगाचे वापरत असे.. त्यानं त्याच्या अनेक प्रयोगांविषयी नेहमी एक गुढ ठेवलं.. विज्ञानातला सर्वोच्च सन्मान मिळूनही तो अध्यात्मिक वृत्तीचा होता.. अर्थात तसं असण्याविषयी वाद नव्हता पण मुद्दा परंपरावाद पाळण्याच्या नादात ‘वांशिक’ भेद करण्याचा होता.. तथाकथित कमअस्सल वंशाच्या अल्पसंख्यांक लोकांना कारावासात डांबण्याऐवजी विषारी वायु असलेल्या चेंबरमध्ये डांबावं अश्या ‘नाझी’ विचारांचा तो नुसता समर्थक नव्हता तर थेट प्रवर्तकही होता..

हुशार लोकं अधिक धोकादायक ठरतात ते असे.. थेट धर्मप्रचारक किंवा मुलतत्ववादी नसले तरी त्याचे विचार अतिउजवे असल्याचं लपून राहिलं नाही.. त्याचं नाव ‘नाझी’ पक्षाशी जोडलं गेलं मानवाचा संस्थात्मक अभ्यास करतांना त्यानं पोषण आणि सार्वजनिक स्वच्छता या विषयावंर भर दिला.. हा विचारही हिटलरच्या उच्चवंशिय आणि सुप्रजनन या वादग्रस्त संकल्पनांशी साधर्म्य असणारा होता.. शेवटी ही संस्था बंद करण्यात आली अन् नाझी समर्थक म्हणून त्याला अटकही झाली.. युद्ध संपलं अन् तो ही.. शेक्सपियरच्या ‘ज्युलियस सिझर’ नाटकात मार्क ॲंटनी हे कॅरेक्टर विलापिकेत म्हणतो,”माणूस गेल्यानंतर फक्त वाईटपणा सोडून जातो त्याच्यातला चांगुलपणा हा नेहमी त्याच्या अस्थींसोबत दफन झालेला असतो!” त्यानं तसं ढोबळपणे सांगायचं तर कुठलंही वाईट कृत्य केलं नाही..उलट त्याच्या काळातला तो एक प्रचंड यशस्वी आणि आकर्षक व्यक्तिमत्व होता..नाझींशी त्याचे लागेबांधे तात्विक मतभेद म्हणून बाजूला ठेवताही येतील पण मेख पुढं आहे.. नव्वदच्या दशकात अतीउजव्या विचारसरणीच्या पक्षानं स्थलांतरीतांच्या फ्रान्समधील प्रवेशाला तीव्र विरोध दर्शवत यामुळं आपला समाज ‘प्रदुषित’ होईल असा तर्क मांडला आणि पुष्ट्यार्थ याच्या पुस्तकातील ‘वंशशुद्धी’ वगैरेचे दाखले दिले..

पॅरीस हे नेहमीच दिलदार लोकांचं गुणग्राहक शहर म्हणून ओळखलं जातं,या शहराला एक मोठा इतिहास आहे,तिथल्या अनेक सुजाण नागरिकांनी या तर्काला मानवतेच्या विरुद्ध आणि भंपक ठरवत सह्यांची एक मोहीम घेऊन सरकारला आयफेल टाॅवरच्या बाजूला ‘त्याच्या’ नावे असलेल्या रस्त्याचं नाव अर्थात ‘ॲलेक्सिस कॅरेल पथ’ हे नाव बदलायला भाग पाडलं.. ‘माणुस संपतो पण विचार नाही’ त्यामुळं ॲलेक्सिसचे विचार लोकं विसरणार नाहीत,त्याचं नाझींशी असलेलं कनेक्शनही लक्ष्यात ठेवलं जाईल पण याच ॲलेक्सिसच्या प्रयोगांमुळं हृदयरोगावरील शस्त्रक्रिया आणि प्रत्यारोपण शस्रक्रिया ही मोठी दालनं वैद्यकशास्रात खुली झाली याबद्दल कुणाचंही दुमत असणार नाही..विज्ञानविश्व आणि आखिल मानवसमुह ॲलेक्सिसच्या या योगदानासाठी शतश: आभारी राहिल..

आज ॲलेक्सिस कॅरेल यांचा स्मृतीदिन..व्यक्तीगत वैचारिक मतभेद असलेत तरी त्यांच्यातील संशोधकाला सलामच !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com