कोरोना लशीचा दुसरा टप्पा आल्यानंतरच परिस्थिती पूर्वपदावर येणार, बिल गेट्स यांचे भाकीत

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 13 October 2020

सामान्य स्थिती होण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील लस व्यापकरित्या उपलब्ध झाली पाहिजे. तेव्हाच कोरोनामुळे निर्माण झालेल्या सर्व समस्यांचे निराकरण केले जाऊ शकते. 

नवी दिल्ली- कोरोनामुळे संपूर्ण जग विस्कळीत झाले आहे. याचदरम्यान मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी जगातील स्थिती सामान्य होण्याबाबत चिंताजनक वक्तव्य केले आहे. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कोरोनासाठी बनत असलेल्या लशीचा दुसरा टप्पा जोपर्यंत येत नाही. तोपर्यंत परिस्थिती सामान्य होणार नसल्याचे मत नोंदवले आहे. 

बिल गेट्स 'एनबीसी'शी बोलताना म्हणाले की, सामान्य स्थिती होण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील लस व्यापकरित्या उपलब्ध झाली पाहिजे. तेव्हाच कोरोनामुळे निर्माण झालेल्या सर्व समस्यांचे निराकरण केले जाऊ शकते. 

हेही वाचा- चार महिन्यांत १८ हजार टन कोरोना कचरा; महाराष्ट्रात सर्वाधिक कचरानिर्मिती

दरम्यान, जॉन्सन अँड जॉन्सनने आपल्या कोरोना लशीची चाचणी रोखली आहे. चाचणीत सहभागी असलेला एक स्वयंसेवक आजारी पडल्यामुळे जॉन्सन अँड जॉन्सनने सध्या कोरोना लशीची चाचणी बंद केली आहे. 

न्यूजर्सी कंपनी न्यू ब्रांसविकचे प्रवक्ते जॅक सर्जेंट यांनी आरोग्याबाबतचे वृत्त देणारी संस्था एसटीएटीचा अहवाल बरोबर असल्याचे सांगितले आणि जॉन्सन अँड जॉन्सनने कोरोना लशीची चाचणी बंद केल्याचे कबूल केले. 

हेही वाचा- 'मोबाईल रेडिएशन कमी करायचंय? गायीच्या शेणाची चीप वापरा'

जॉन्सन अँड जॉन्सनने लशीच्या अंतिम टप्प्यातील चाचणीचे परीक्षण सुरु केले होते. या अंतर्गत अमेरिका, दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, चिली, कोलंबिया, मेक्सिको आणि पेरुतील 60 हजार लोकांवर याचे परीक्षण केले जाईल, असे कंपनीने म्हटले होते. यापूर्वी अ‍ॅस्ट्रोजेनका कंपनीने कोरोना लशीची चाचणी रोखली होती. त्यानंतर जॉन्सन अँड जॉन्सनकडूनही अशाचप्रकारचे वृत्त समोर आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Normalcy only when second generation of Covid 19 vaccine is out says Bill Gates