उत्तर कोरियाकडून पुन्हा क्षेपणास्त्राची चाचणी

वृत्तसंस्था
बुधवार, 5 एप्रिल 2017

उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचणी केल्यानंतर त्या देशाच्या आक्रमक हालचालींकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. तसेच संरक्षण सज्जही आहोत

सोल  जागतिक पातळीवरील दबाव झुगारत उत्तर कोरियाने आज पुन्हा मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. उत्तर कोरियाने डागलेले "केएन-15' प्रकारातील मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र जपानच्या समुद्रात पडले असल्याची माहिती दक्षिण कोरिया आणि अमेरिकेकडून देण्यात आली. आण्विक कार्यक्रम बंद करण्यासाठी जागतिक सुमदायाने दबाव वाढविल्यास क्षेपणास्त्र चाचणीने त्याला उत्तर देण्याची धमकी उत्तर कोरियाने यापूर्वीच दिली आहे. एकूणच कोरियन द्वीप्रकल्प विभागात सध्या प्रचंड तणावाचे वातावरण आहे.

"उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचणी केल्यानंतर त्या देशाच्या आक्रमक हालचालींकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. तसेच संरक्षण सज्जही आहोत,'' असे वक्तव्य दक्षिण कोरियाच्या संरक्षणमंत्र्यांनी केले. जपान आणि दक्षिण कोरिया या आमच्या मित्र देशांच्या साथीने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आम्ही उत्तर कोरियाच्या हालचालींवर नजर ठेवून आहोत, असे निवेदन आशिया-प्रशांत विभागातील अमेरिकेच्या लष्करी तळातर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे.

उत्तर कोरियाची चिथावणीखोर कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत, असा इशारा जपानकडून देण्यात आला आहे. क्षेपणास्त्र चाचणीचा जपानने निषेध केला असून, उत्तर कोरियाकडून संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) सुरक्षा परिषदेच्या ठरावांचे उल्लंघन झाले असल्याचे म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला कारवाईचा इशारा दिला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून उत्तर कोरियाने आज क्षेपणास्त्र चाचणी घेतली असल्याचे सांगण्यात आले. क्षेपणास्त्र चाचणी किंवा अणू चाचणी करण्यास "यूएन'च्या ठरावाद्वारे उत्तर कोरियावर बंदी घालण्यात आलेली आहे.

Web Title: North Korea fires ballistic missile