उत्तर कोरियाकडून सहावी अणुचाचणी...

वृत्तसंस्था
रविवार, 3 सप्टेंबर 2017

या चाचणीनंतर उत्तर कोरियाचा एकमेव मित्रदेश असलेल्या चीननेही तीव्र नाराजी व्यक्त केली असून कट्टर शत्रू असलेल्या दक्षिण कोरियाने सुरक्षा व्यवस्था आणखी कडक केली असून अमेरिकेबरोबर याबाबत चर्चा सुरु केली आहे. आजचा स्फोट हा हायड्रोजन बॉंबचा असल्याचा दावा उत्तर कोरियाने केला असला तरी तज्ज्ञांनी तसा निर्वाळा अद्याप दिलेला नाही

सोल - अमेरिका आणि उर्वरित जागतिक शक्तींच्या धमक्‍यांना भीक न घालणाऱ्या उत्तर कोरियाने आज सहावी अणु चाचणी घेत हायड्रोजन बॉंबचा स्फोट घडवून आणला. या स्फोटानंतर जमिनीमध्ये निर्माण झालेली कंपने पाहता हा आतापर्यंतचा सर्वांत शक्तीशाली स्फोट असल्याचे मानले जात आहे. या चाचणीनंतर चीनसह जगभरातील देशांनी उत्तर कोरियाविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे.

आजच्या चाचणीमुळे अमेरिकेच्या भूमीवर परिणामकारक क्षेपणास्त्र हल्ला करण्याच्या आपल्या स्वप्नाच्या दिशेने उत्तर कोरियाने एक पाऊल पुढे टाकले आहे. उत्तर कोरियाने गेल्या वर्षी केलेल्या पाचव्या अणु चाचणीवेळी केलेल्या स्फोटापेक्षा पाच ते सहा पट मोठा आजचा स्फोट होता. या हायड्रोजन बॉंबची क्षमता 50 ते 60 किलोटन असण्याचा अंदाज आहे. उत्तर कोरियाने त्यांच्या सरकारी वाहिनीवर ही चाचणी यशस्वी झाल्याचे प्रसिद्ध केले. "या दोन टप्प्याच्या थर्मोन्यूक्‍लिअर शस्त्रामध्ये अकल्पित ताकद' असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

नव्या आंतरखंडिय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रासाठी तयार केलेल्या हायड्रोजन बॉंबची ही चाचणी उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्या उपस्थितीतच झाल्याचा दावाही या वाहिनीने केला आहे.

उत्तर कोरियाने चाचणी घेतलेल्या हॅमगॉंग प्रांतामध्ये दुपारी साडे बाराच्या सुमारास 5.7 रिश्‍टर तीव्रतेचा कृत्रिम भूकंप झाल्याचे दक्षिण कोरियाच्या हवामान विभागाने सांगितले. या चाचणीनंतर उत्तर कोरियाचा एकमेव मित्रदेश असलेल्या चीननेही तीव्र नाराजी व्यक्त केली असून कट्टर शत्रू असलेल्या दक्षिण कोरियाने सुरक्षा व्यवस्था आणखी कडक केली असून अमेरिकेबरोबर याबाबत चर्चा सुरु केली आहे. आजचा स्फोट हा हायड्रोजन बॉंबचा असल्याचा दावा उत्तर कोरियाने केला असला तरी तज्ज्ञांनी तसा निर्वाळा अद्याप दिलेला नाही.

या चाचणीनंतर कोणताही किरणोत्सर्ग झाला नाही. मात्र, उत्तर कोरियाच्या अत्यंत गोपनीय अणु कार्यक्रमाची माहिती मिळविणे अत्यंत अवघड असल्याने या चाचणीची सत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न होत आहे.

क्षेपणास्त्र चाचण्यांचा धडाका कायम
उत्तर कोरियाने गेल्या वर्षी दोन वेळेस अणु चाचणी घेतली. 9 सप्टेंबरला पाचवी अणु चाचणी घेतल्यानंतर त्यांनी सातत्याने क्षेपणास्त्र चाचण्या घेत वातावरणात तणाव कायम ठेवला होता. यावर्षी जुलैमध्ये त्यांनी आंतरखंडिय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या दोन चाचण्या घेतल्याने अमेरिकेनेही आक्रमक पवित्रा घेतला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी डागलेले एक क्षेपणास्त्र जपानच्या एका बेटावरून गेले होते. 2011 मध्ये सत्तेत आल्यापासून किम जोंग उन यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अमेरिकेच्या पॅसिफिक महासागरातील गुआम या तळाला लक्ष्य करू शकणाऱ्या क्षेपणास्त्र चाचणीही उत्तर कोरियाने काही दिवसांपूर्वीच घेतली होती.

Web Title: north korea hydrogen bomb usa