अमेरिकेत "अग्नितांडवा'ची उत्तर कोरियाची धमकी

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये केलेल्या मग्रूर भाषणामुळे आमच्याविरोधातील युद्धाची ठिणगी पडली आहे. आम्ही आता बोलणार नाही; निव्वळ अग्नितांडवानेच याचे उत्तर देऊ

मॉस्को - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी "युद्धाची ठिणगी' टाकली असून आता अमेरिकेस याचा मोबदला अग्नितांडवाचा सामना करुन चुकवावा लागेल, असा इशारा उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिला आहे.

कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्यांवरुन निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेची दोन लढाऊ विमाने नुकतीच कोरिअन द्वीपकल्पावरुन उडाल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे. उत्तर कोरियासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उच्चस्तरीय सुरक्षा अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचेही सूत्रांनी म्हटले आहे.

गेल्या काही आठवड्यांत उत्तर कोरियाने तब्बल सहा अणुचाचण्या केल्या आहेत. अमेरिकेस लक्ष्य करु शकणाऱ्या आण्विक क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यासाठी उत्तर कोरिया प्रयत्नशील असल्याचे मानले जात आहे. उत्तर कोरियाच्या या धोरणामुळे या भागामध्ये प्रचंड राजनैतिक तणाव निर्माण झाला आहे.

""ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये केलेल्या मग्रूर भाषणामुळे आमच्याविरोधातील युद्धाची ठिणगी पडली आहे. आम्ही आता बोलणार नाही; निव्वळ अग्नितांडवानेच याचे उत्तर देऊ,'' असा इशारा उत्तर कोरियाकडून या पार्श्‍वभूमीवर देण्यात आला आहे.

 

Web Title: North Korea says Trump has 'lit the wick of war'