उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांची ऐतिहासिक भेट 

पीटीआय
शनिवार, 28 एप्रिल 2018

समान उद्दिष्टांसाठी परस्पर सहकाऱ्यात वाढ करत शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करण्याचा विश्वास दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला. दक्षिण आणि उत्तर कोरियाच्या दरम्यानच्या युद्धाला पूर्णविराम देण्याचा निश्‍चयही या वेळी करण्यात आला. 

सोल : दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियाच्या अध्यक्षांनी आज दोन्ही देशांना विभागणारी सीमारेषा पार करत परस्परांशी हस्तांदोलन केले आणि या ऐतिहासिक भेटीमुळे दोन्ही देशांच्या संबंधांमधील नव्या पर्वाला सुरवात झाल्याची भावना दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली. या ऐतिहासिक हस्तांदोलनामुळे आण्विक युद्धाचे ढग जमा झालेल्या कोरियन द्वीपकल्पात सध्या शांततेचे वारे वाहू लागतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. 

आण्विक निशस्त्रिकरणावर भर 
दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग ऊन यांच्यात आज झालेल्या बैठकीत कोरियन द्वीपकल्पाचे आण्विक निशस्त्रिकरण करण्याचा निश्‍चय करण्यात आला. किम जोंग आणि मून यांच्यात झालेल्या चर्चेनंतर दोन्ही देशांनी संयुक्त जाहिरनामा प्रसिद्ध केला असून, त्यात संपूर्णपणे आण्विक निशस्त्रिकरण करण्यावर भर देण्यात आला आहे.

समान उद्दिष्टांसाठी परस्पर सहकाऱ्यात वाढ करत शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करण्याचा विश्वास दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला. दक्षिण आणि उत्तर कोरियाच्या दरम्यानच्या युद्धाला पूर्णविराम देण्याचा निश्‍चयही या वेळी करण्यात आला. 

संवाद वाढविणार 
किम जोंग यांच्या आमंत्रणावरून मून हे लवकरच उत्तर कोरियाला भेट देणार असल्याचेही या वेळी स्पष्ट करण्यात आले. दोन्ही देशांच्या दरम्यान सातत्याने बैठका घेण्याची आणि दूरध्वनीवरून थेट चर्चा करून संवाद प्रक्रियेला गती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास दोन्ही नेत्यांनी परस्परांना दिला. 

नव्या पर्वाची सुरवात : किम जोंग ऊन 

"कोरियन युद्धातील गोळीबार थांबल्यानंतर दोन्ही देशांना विभागणारी सीमारेषा ओलांडून दक्षिण कोरियात प्रवेश करणारा मी उत्तर कोरियाचा पहिलाच नेता ठरलो आहे. या वेळी मी खूप भावनाशील झालो होतो. नव्या ऐतिहासिक पर्वाची सुरवात करण्याचा निश्‍चय करून मी दक्षिणे कोरियात पाय ठेवला आहे,'' असे किम जोंग यांनी म्हटले आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: North Koria South Koria President Historic meeting