चीनला हवीय शांतता! युद्ध किंवा शीतयुद्ध नको असल्याचं UN मध्ये केलं वक्तव्य

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 September 2020

त्यांनी हेही स्पष्टपणे नमूद केलं की, चीन आपले सर्व वाद आणि मतभेद चर्चेच्या माध्यमातूनच सोडवण्याचा प्रयत्न सुरु ठेवेल. 

संयुक्त राष्ट्र : चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि भारतात लडाख सीमेवर सुरु असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अप्रत्यक्षपणे काही वक्तव्ये केली आहेत. कोणत्याही देशाशी युद्ध अथवा शीतयुद्धाच्या भानगडीत पडण्याच्या विचारात चीन नाही,  असं त्यांनी बोलून दाखवलं. जगातील मोठ्या राष्ट्रांनी मोठ्यासारखंच वागायला हवं. सभ्य राष्ट्रांनी लढाई-युद्धाच्या प्रकारात पडलं नसलं पाहिजे, असंही ते म्हणाले. 

याआधी डोनाल्ड ट्रप्म यांनी कोरोना महामारीच्या एकूण हाहाकाराबद्दल चीनला दोषी ठरवण्याची मागणी केली होती. पूर्व लडाख मध्ये भारतासह गेल्या महिन्यांपासून चालू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जिनपिंग यांनी महासभेतील आपल्या भाषणात म्हटलं की, चीन कधीच आपलं आधिपत्य वाढवण्यासाठी किंवा आपला प्रभाव इतर ठिकाणी वाढवण्यासाठी प्रयत्न करणार नाही. त्यांनी हेही स्पष्टपणे नमूद केलं की, चीन आपले सर्व वाद आणि मतभेद चर्चेच्या माध्यमातूनच सोडवण्याचा प्रयत्न सुरु ठेवेल. 

हेही वाचा - कांदा, बटाटा जीवनावश्यक नाही; दुरुस्ती विधेयकाला मंजुरी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जेव्हा 4 जुलै रोजी लडाखमध्ये गेले होते तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की, विस्तारवादाचे युग आता समाप्त झाले आहे. या वक्तव्याला चीनला दिलेला एक संदेश अशा नजरेतूनच पाहण्यात आलं होतं. भारताने आतापर्यंत चीनच्या कुरघोड्यांना उत्तरे ही आपल्या आर्थिक आघाड्यांवर कूटनीतीने देण्याचा प्रयत्न केला आहे. देशातील कित्येत क्षेत्रामधून चीनी संस्था आणि कंपन्यांचा हस्तक्षेप कमी करण्याचा प्रयत्न भारताकडून केला गेला आहे. 

या साऱ्यावरही चीनच्या राष्ट्रपतींनी अप्रत्यक्षपणे भाष्य केले आहे. शी जिनपिंग यांनी म्हटलं की, आमचा देश बंद दरवाजामागून आपला विकास करणार नाहीये. चीनचा आर्थिक विकास आणि सोबतच जागतिक अर्थव्यवस्था देखील विकसित करण्याचा आम्ही प्रयत्न करू. 

हेही वाचा - दिलासादायक! मागील 24 तासांत 1 लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त

कोरोना व्हायरस प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या टिकेला उत्तर देताना त्यांनी म्हटलं की, आपल्याला एकमेकांसोबत उभं राहिलं पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वात विज्ञानाचे अनुसरण करायला हवं. आणि या मुद्यावरुन राजकारण करण्याचा प्रयत्न आपण धुडकावून लावला पाहिजे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Not interested in war or cold war says Chinese President Xi Jinping in UN