आता उंदीरही खेळतील लपाछपी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

जर्मनीच्या शास्त्रज्ञांनी उंदराना दिले प्रशिक्षण

बर्लिन : विज्ञानात दिवसेंदिवस नवनवे शोध लागत आहेत. यासाठी शास्त्रज्ञ दिवस-रात्र मेहनत करत असतात. अशाच काही जर्मनीच्या शास्त्रज्ञांनी चक्क उंदीर या प्राण्याला मानवासोबत लपाछपी खेळायला शिकविले आहे. 

यासाठी शास्त्रज्ञांनी न्यूरोबायोलॉजीचा अभ्यास करून उंदरांना लपाछपी खेळण्याचे प्रशिक्षण दिले आहे. जर्मनीच्या बर्लिनमधील हम्बोल्ट  युनिव्हर्सिटीच्या अनिका रेनहोल्ड आणि तिच्या सहकाऱ्यांनी उंदरांना हे प्रशिक्षण दिले आहे. सुरुवातीला या शास्त्रज्ञांनी उंदरांसोबत चांगली मैत्री करण्याचा प्रयत्न केला. 

त्यानंतर त्यांनी हळूहळू उंदरांना लपण्याचे व शोधण्याचे प्रशिक्षण द्यायला शिकविले. यावेळी जर उंदरांनी त्यांचे काम बरोबर केले तर त्यांचे लाड केले जात, ज्यामुळे उंदीर आणखी उत्साहाने खेळत. असे करत काही आठवड्यातच उंदीर केवळ लपाछपी खेळण्यास शिकले नाहीत, तर लपणे आणि शोधणे यातील फरकही शिकले. आता खेळत असताना जर आम्ही लपलो तर जोवर आम्ही भेटत नाही तोवर उंदीर आम्हाला शोधत राहातात, तसेच जेव्हा ते लपतात, तेव्हा आम्ही त्यांना शोधत नाही तोपर्यंत ते कोणतीही हालचाल करत नाहीत, असेही अनिका यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now rats will play hide and seek