NYSE, Nasdaq मार्केटने रशियन कंपन्यांच्या शेअर्सवर आणली बंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market News

NYSE, Nasdaq मार्केटने रशियन कंपन्यांच्या शेअर्सवर आणली बंदी

रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये सध्या युद्ध सुरु आहे. या युद्धाचा आज सहावा दिवस आहे. कालपासून दोन्ही देशांमध्ये वाटाघाटीसाठी चर्चा सुरु झाली आहे. एकीकडे रशियाने युक्रेनवर हे युद्ध लादल्याने त्यांचं बरचंसं नुकसान झालं आहेच, मात्र, रशियाच्या या कृतीचा निषेध म्हणून अनेक प्रकारे अनेक देशांनी आणि संघटनांनीही रशियावर वेगवेगळ्या स्वरुपाचे निर्बंध लादले आहेत. या साऱ्या घडामोडींचा फटका खुद्द रशियाला देखील बसला आहे. रशियातील शेअर मार्केट पूर्णपणे बंद असून चलन देखील कोसळलं आहे. (NYSE Nasdaq halt trading in stocks of Russia based companies)

दुसरीकडे आता Nasdaq Inc (NDAQ.O) आणि इंटरकांटिनेंटल एक्स्चेंज इंक (ICE.N) NYSE आपल्या एक्स्चेंजमधील यादीमधून रशियामधील कंपन्यांचे शेअर्स मार्केटमधून अस्थायी काळासाठी थांबवले आहेत. या प्रकरणी तज्ज्ञांनी म्हटलंय की, युद्धाच्या पार्श्वभूमीवर चिंतेमुळे ही बंदी घालण्यात आली आहे. रशियाने केलेल्या आक्रमणामुळे हे प्रतिबंध लादण्यात आले आहेत.

Nasdaq मधील स्टॉक्समध्ये नेक्सटर्स इंक, हेडहंटर ग्रुप पीएलसी (HHR.O), ओझोन होल्डिंग्स पीएलसी (OZON.O), किवी पीएलसी (QIWI.O) आणि यांडेक्स (YNDX.O) वरही बंदी घालण्यात आली आहे. NYSE च्या यादीमधील स्टॉक्समध्ये Cian PLC (CIAN.N), मेकेल पीएओ आणि मोबाइल टेलीसिस्टम्स पीएओवर देखील बंदी घालण्यात आली आहे. NYSE च्या ICE ने असं देखील म्हटलंय की, ते बंदी घालण्यात आलेल्या रशियन कंपन्यांना कोणतंही नवं कर्ज देऊ शकणार नाही.

"आम्ही युक्रेनमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. तसेच बाजारात स्थैर्य राखण्यासाठी आणि ग्राहकांना आणि एकूण इंडस्ट्रीला एक निश्चितता प्रदान करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत," असं एका न्यूयॉर्कमधील कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटलंय.