"विकीलीक्‍स' घडविणाऱ्यास ओबामांकडून दया

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जानेवारी 2017

मॅनिंग हिच्या या प्रकरणासंदर्भात अमेरिकेमध्ये मिश्र जनमत दिसून आले आहे. एका मतप्रवाहानुसार मॅनिंगने ही माहिती उघड करुन सरळ सरळ देशद्रोह केला आहे; तर दुसऱ्या मतप्रवाहानुसार तिने अमेरिकन लष्कराची गुप्त माहिती उघड करुन मोठे धैर्य दर्शविले आहे

न्यूयॉर्क - अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकन सैन्यदलाची संवेदनशील माहिती उघड करणाऱ्या 29 वर्षीय चेल्सी मॅनिंग या ट्रान्सजेंडर अधिकाऱ्याची शिक्षा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या उघड झालेल्या माहितीमुळे; अर्थातच "विकीलीक्‍स'मुळे जगभरात खळबळ उडाली होती. "विकीलीक्‍स'मुळे अमेरिकन नेतृत्वासमोर काही "अडचणी'ही निर्माण झाल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा हा निर्णय अत्यंत संवेदनशील मानला जात आहे. मॅनिंगसहितच ओबामांनी इतर 208 जणांची शिक्षा कमी केली आहे; तर 64 जणांना दया दर्शविली आहे.

ही माहिती उघड करणाऱ्या ब्रॅडले मॅनिंग (चेल्सी मॅनिंग) या अधिकाऱ्यास 35 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली होती. मात्र ओबामांच्या या नव्या निर्णयानुसार आता मॅनिंग ची मुक्तता येत्या मे महिन्यात केली जाणार आहे. पुरुषांच्या तुरुंगात ठेवण्यात आलेल्या मॅनिंग हिने गेल्या वर्षी दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याशिवाय, तिने अन्न सत्याग्रहही पुकारला होता.

मॅनिंग हिच्या या प्रकरणासंदर्भात अमेरिकेमध्ये मिश्र जनमत दिसून आले आहे. एका मतप्रवाहानुसार मॅनिंगने ही माहिती उघड करुन सरळ सरळ देशद्रोह केला आहे; तर दुसऱ्या मतप्रवाहानुसार तिने अमेरिकन लष्कराची गुप्त माहिती उघड करुन मोठे धैर्य दर्शविले आहे. अमेरिकेमधील "हाऊस स्पीकर' पॉल रायन यांनी ओबामांचा हा निर्णय म्हणजे देशद्रोह असल्याची टीका केली आहे. या पार्श्‍वभूमीवर या निर्णयामागील स्पष्टीकरण व्हाईट हाऊसकडून देण्यात आलेले नाही.

Web Title: Obama commutes Chelsea Manning sentence