
काबूल : अनेक वर्षांच्या संघर्षामुळे अफगाणिस्तानमधील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असतानाच आता कोरोनाची लाट (Corona Crisis) असतानाही देशातील आरोग्य यंत्रणा मोडकळीस आली असल्याने जनतेची आरोग्य सुरक्षा धोक्यात आली आहे. संपूर्ण देशात केवळ पाच रुग्णालयांमध्ये कोरोनाग्रस्तांवर उपचार होत असून डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचारीच उपलब्ध नसल्याने ३३ रुग्णालये बंद पडली आहेत. (Afghanistan Crisis)
अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आली असली तरी हिंसाचारात फारशी घट झालेली नाही. अमेरिका आणि इतर देशांनी अर्थपुरवठा रोखल्याने देशाची अर्थव्यवस्थाही रसातळाला गेली आहे. यातच देशात सध्या कोरोना संसर्गाची लाट वेगाने पसरत असून रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. मात्र, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि इतर वैद्यकीय साहित्याच्या अभावी कोरोना संसर्गावर उपचार करणारी ३३ रुग्णालये बंद पडली आहेत. संपूर्ण देशात केवळ पाच रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. राजधानी काबूलमध्येही एकच कोरोना रुग्णालय आहे. येथेही इंधन आणि वीज पुरवठ्याचा तुटवडा असल्याने प्रचंड थंडीतही रुग्णांना कुडकुडत बसावे लागते. या रुग्णांना ऑक्सिजनपासून ते कापसापर्यंत सर्वच गोष्टींची कमतरता भासत आहे, असे येथील डॉक्टरांनी सांगितले.
अर्थपुरवठ्या अभावी दुरवस्था
अफगाणिस्तानमधील आरोग्य यंत्रणा गेल्या दोन दशकांपासून केवळ विदेशी मदतीच्या आधारावर तग धरून होती. तालिबानची सत्ता आल्याने या यंत्रणेला घरघर लागली आहे. त्यामुळे जनतेच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. देशातील ९० टक्के जनता गरीब असून दहा लाखांहून अधिक बालकांसमोर कुपोषणाचा धोका आहे. देशात ओमिक्रॉनचा संसर्ग वेगाने पसरत असतानाही विदेशांतून कोणतीही मदत पोहोचत नसल्याने फार मोठी समस्या निर्माण होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अफगाणिस्तानमध्ये या महिन्याच्या अखेरीपर्यंत वैद्यकीय साहित्याचा पुरवठा केला जाईल, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.