esakal | ऑपरेशन थंडरबोल्ट: जेव्हा इस्त्राईलच्या 'मोसाद'ने दाखवला जगाला पराक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

operation thunderbolt israil mossad commando perration in uganda.jpg

27 जून 1976 रोजी इस्त्राईलची राजधानी तेल अवीव येथील विमानतळावरुन रात्री 11 वाजता एक विमान ग्रीसची राजधानी एथेंसकडे निघाले होते. या विमानात 246 प्रवाशांसह 12 क्रू सदस्य होते. या सर्वांना माहित नव्हतं की यांच्यासमोर काय वाढून ठेवलं होते.

ऑपरेशन थंडरबोल्ट: जेव्हा इस्त्राईलच्या 'मोसाद'ने दाखवला जगाला पराक्रम

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

तेल अवीव- 27 जून 1976 रोजी इस्त्राईलची राजधानी तेल अवीव येथील विमानतळावरुन रात्री 11 वाजता एक विमान ग्रीसची राजधानी एथेंसकडे निघाले होते. या विमानात 246 प्रवाशांसह 12 क्रू सदस्य होते. या सर्वांना माहित नव्हतं की यांच्यासमोर काय वाढून ठेवलं होते.

जवळपास अडीच तासानंतर हे विमान एथेंस येथे पोहोचले. येथे 58 प्रवाशी आणि 7 दहशतवादी या विमानात बसले. यातील दोन दहशतवादी पॅलिस्टिनी लिबरेशन आर्मीशी संबंधित होते, तर 2 जर्मन रिवोल्यूशनरी ब्रिगेडशी संबंधित होते. या दहशतवाद्यांना या विमानाचे अपहरण करायचे होते. एथेंसमधून जेव्हा हे विमान फ्रान्सची राजधानी पॅरिससाठी निघाले, तेव्हा दहशतवाद्यांनी या विमानाने अपहरण केले. 

पाकिस्तानची बालीशपणाची हद्द; काश्मिर ताब्यात घेण्याचे पाहतोय स्वप्न

सुरुवातीला दहशतवाद्यांनी हे विमान लिबियातील बेनगाजी येथे नेले. येथे विमानात इंधन भरण्यात आलं. सात तास येथे थांबल्यानंतर दहशतवाद्यांनी एका आजारी महिलेला येथे सोडून दिले. त्यानंतर दहशतवाद्यांनी अनेक अरब देशांना विमान उतरु देण्याची मागणी केली, पण कोणत्याही देशाने त्यांना आपल्या देशात विमान उतरु दिलं नाही. 

28 जूनला दुपारी 3 वाजता दहशतवाद्यांनी हे विमान युगांडाच्या एंतेबे हवाई तळावर उतरवले. तत्काळीन हुकूमशादा ईदी अमीन यांनी अपहरणकर्त्यांच्या मागणीनुसार सर्व सुविधा पुरवल्या. शिवाय विमानतळावर ईदी अमीनने या विमानाला सुरक्षा पुरवली. विमान येथे उतरल्यानंतर सर्व प्रवाशांना जवळच्या टर्मिनलमध्ये घेऊन जाण्यात आले.

विमान अपहरणाच्या बातमीने इस्त्राईलमध्ये खळबळ उडाली. इस्त्राईल सरकारने लष्कर प्रमुख आणि गुप्तचर संघटना मोसादच्या प्रमुखांची बैठक घेतली. यावेळी दहशतवाद्यांच्या मागण्या अगोदर ऐकण्याचं ठरवलं. दहशतवाद्यांनी इस्त्राईलच्या तुरुंगामध्ये बंद असलेल्या त्यांच्या साथीदारांना सोडण्याची मागणी केली. याशिवाय परदेशात असणाऱ्या साथीदारांना सोडण्यासोबत 5 मिलियन अमेरिकी डॉलरची मागणी त्यांनी केली. यासाठी दहशतवाद्यांनी इस्त्राईलला 48 तासांचा वेळ दिला.  

इस्त्राईलने आपल्या शत्रूंसोबत कधीही तडजोड केलेली नाही. दहशतवाद्यांचे लक्ष हटवण्यासाठी इस्त्राईलने त्यांच्यासोबत चर्चा सुरु केली. यानंतर इस्त्राईलची गुप्तचर संघटना मोसादने हवाईतळाची माहिती गोळा करणे सुरु केले. 30 जून रोजी वयस्कर आणि आजारी 48 लोकांना सोडून दिलं. 

अमेरिकेच्या इतिहासात जे घडलं नाही त्यासाठी ट्रम्प यांचा हट्ट

इस्त्राईलने दहशतवाद्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी 4 जूलैपर्यंतची वेळ मागितली. त्यामुळे दहशतवाद्यांना इस्त्राईल आपल्यासमोर झूकत असल्याचं वाटलं. दहशतवाद्यांनी गैर इस्त्राईली लोकांना सोडून दिले. त्यामुळे त्यांच्या ताब्यात आता 116 इस्त्राईली प्रवासी राहिले.  

3 जूलै रोजी इस्त्राईलने ऑपरेशन थंडरबोल्डची योजना आखली. यादरम्यान मोसादने दहशतवाद्यांनी सोडून दिलेल्या गैर-इस्त्राईली प्रवाशांकडून महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. यात दहशतवाद्यांची संख्या आणि त्यांच्या शस्त्रास्त्रांची माहिती मिळवण्यात आली. यानंतर मोसादला हेही कळालं की, एंतेहे हवाईतळावरील एक टर्मिनल इस्त्राईलच्या कंपनीनेच बनवलं आहे. ऑपरेशनमध्ये सामील असलेल्या सर्व कमांडोंना हवाईतळाचा नकाशा समजवण्यात आला.

3 जूलै रोजी इस्त्राईलच्या 100 कमंडोच्या टीमने 130 सुपर हरकुलिस विमानाने युगांडाच्या एंतेबेकडे उड्डान केले. सोबत दोन बोईंग 707 विमानही घेण्यात आले. एकात वैद्यकीय गट आणि दुसऱ्यात प्रवाशांना घेऊन जाण्यात येणार होते. या विमानात काळ्या रंगाच्या मर्सीडीच कार ठेवण्यात आल्या होत्या. त्यावेळी युंगाडाचे हुकूमशाहा ईदी अमीन काळ्या रंगाच्या मर्सिडीजमधून प्रवास करायचे. त्यामुळे दहशतवादी आणि युंगाडाच्या सैन्याला भ्रमात घालण्यासाठी इस्त्राईलने ही योजना बनवली होती. 

रात्री इस्त्राईली विमाने एंतेबे हवाईतळावर उतरली. त्यानंतर मर्सिडीज कार घेऊन कमांडो टर्मिनल बिल्डिंगकडे वेगाने निघाले. मात्र, त्यांना हे माहित नव्हतं की त्यावेळी ईदी अमीन युगांडामध्ये नाहीत. त्यामुळे इस्त्राईलची पंचायत झाली. मात्र, इमारतीची पूर्ण माहिती असल्याने कमांडो वेगाने बंधक असणाऱ्यांपाशी पोहोचले. त्यांनी हिब्रु भाषेत जोऱ्यात ओरडून प्रवशांना खाली झोपण्यासं सांगितलं. या कारवाईत सात दहशतवादी आणि युगांडा सैनेचे जवळजवळ 50 जवान मारले गेले. यात 3 इस्त्राईली बंधकांचाही मृत्यू झाला. मात्र, कमांडोंनी ऑपरेशन यशस्वी केलं होतं. येतेवेळी इस्त्राईली कमांडोने हवाईतळावरील युंगांडाचे सर्व लढाऊ विमाने बॉम्बने उडवून दिले. 

या ऑपरेशनमध्ये इस्त्राईली यूनिटचे कमांडर आणि सध्याचे प्रधानमंत्री बेंजामीन नेतन्याहू यांचे बंधू योनाथन नेतन्याहू यांचा मृत्यू झाला होता. मोसादने प्रवाशांना सूखरुप मायदेशी आणलं होतं. अशक्य वाटणारा पराक्रम इस्त्राईलच्या मोसादने करुन दाखवला होता. आपल्या लोकांना वाचवण्यासाठी कुठपर्यंत जाऊ शकतो, हे इस्त्राईलने संपूर्ण जगाला दाखवून दिलं होतं. या ऑपरेशननंतर मोसादचं जगभरात कौतुक झालं.