पाकमध्ये विरोधी नेत्यांची धरपकड; शाहबाझना अटक, झरदारी यांच्यावर खटला

Mariyam-and-Bilaval
Mariyam-and-Bilaval

लाहोर - पाकिस्तानमधील विरोधकांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्यासाठी कंबर कसताच घडामोडींना वेग आला आहे. विरोधी पक्षनेते तसेच पाकिस्तान मुस्लीम लिगचे (नवाझ) अध्यक्ष शाहबाझ शरीफ यांना सोमवारी अटक झाली. मग काही तासांत माजी अध्यक्ष असिफ अली झरदारी यांच्यावर खटला भरण्यात आला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शाहबाझ यांच्यावर सात अब्ज रुपयांच्या मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाहोर उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळून लावला. भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरविण्यात आलेले माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे ते लहान भाऊ आहेत.

राष्ट्रीय उत्तरदायित्व आयोगाच्या अधिकाऱ्यांनी शाहबाझ यांना नजरकैद केंद्रात आणले. त्यानंतर त्यांना प्रत्यक्ष अटकेसाठी या आयोगाच्या न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. आयोगाचे पथक आणि शाहबाझ यांच्या वकिलाचा युक्तिवाद झाल्यानंतर सरदार अहमद नईम यांच्या नेतृत्वाखालील द्विसदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिला.

शाहबाझ 69 वर्षांचे आहेत. 2008 ते 2018 दरम्यान ते पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री होते. गेल्याच आठवड्यात इम्रान सरकारने ते व त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध खटला भरला. शाहबाझ यांनी हम्झा व सलमान या आपल्या दोन मूलांसह बनावट खात्यांतून अफरातफर केल्याचा आरोप इम्रान यांचे सल्लागार (गृह आणि उत्तरदायित्व) शहझाद अकबर यांनी गेल्या आठवड्यात केला होता. शाहबाझ यांच्या कुटुंबियांनी 177 संशयास्पद व्यवहार केल्याचे आयोगाला आढळून आले. त्यानंतर चौकशी सुरू करण्यात आली. आपल्या तसेच मूलांच्या मालकीच्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या मदतीने गैरव्यवराह करण्यात आला. याशिवाय मर्जीतील लोकांना पक्षाची तिकिटे तसेच प्रकल्पांची कंत्राटे देण्यासाठीही लाच तसेच दलाली घेण्यात आली, असा दावा अकबर यांनी केला झरदारींवरही खटला.

दरम्यान, माजी अध्यक्ष असिफ अली झरदारी आणि त्यांची बहीण फर्याल टालपूर यांच्यावर भ्रष्टाचारविरोधी न्यायालयाने मनी लाँडरींगप्रकरणी आरोप ठेवला आहे. 63 वर्षीय झरदारी हे माजी पंतप्रधान दिवंगत बेनझीर भुट्टो यांचे पती आहेत. त्यांनी बनावट खाती उघडून पैशाचा अपहार केल्याचा आरोप आहे.

त्यांचा मुलगा बिलावल याने सांगितले की, असिफ आणि टालपूर गेली दोन वर्षे न्यायालयात खेपा घालत आहेत. फरार देशद्रोही, पंतप्रधानांची बहिणी, तीन विशेष सल्लागार, काही मंत्री यांचे समन्स मात्र काढले जाणार नाही, कारण पाकिस्तानमध्ये दोन कायदे आहेत.

अटकेचे संकेत
आपल्याला अटक होणार असल्याचे संकेत शाहबाझ यांनी आधीच दिले होते. त्यांनी पत्रकारांना सांगितले होते की, मला अटक व्हायला हवी अशी पंतप्रधान इम्रान खान यांची इच्छा आहे. इम्रान आणि राष्ट्रीय उत्तरदायित्व आयोग यांच्या अभद्र युतीला मला गजाआड करायचे आहे.

मोठ्या भावाची (नवाझ) साथ सोडली नाही याच एका कारणाने शाहबाझ यांना अटक झाली. सरकारने त्यांना राजकीय बळी ठरविले, पण अशा सुडाच्या राजकारणामुळे आमच्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचणार नाही.
- मरीयम नवाझ, पक्ष प्रवक्त्या

शाहबाझ यांच्या अटकेचा आम्ही निषेध करतो. विरोधी पक्षांनी युती स्थापन केल्यामुळे पंतप्रधान इम्रान खान चिंताक्रांत झाले होते. आपले सरकार पडण्याची भिती त्यांना वाटू लागली आहे.
- बिलावल भुट्टो-झरदारी, पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com