टिकटॉकच्या खरेदीसाठी भिडू मिळाला; कारभार नव्या कंपनीच्या हाती

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 14 September 2020

टिकटॉक हे ॲप खरेदी करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि ओरॅकल या दोन कंपन्यांमध्ये मोठी शर्यत होती.​

वॉशिंग्टन- जगभरामध्ये धुमाकूळ घालणारी चिनी कंपनी बाईटडान्सचा शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म असणाऱ्या टिकटॉक ॲपचा अमेरिकी बाजारपेठेतील सगळा कारभार खरेदी करण्यासाठी नवा भिडू मिळाला आहे. अमेरिकेमध्ये लवकरच टिकटॉकवर पूर्णपणे ओरॅकलचे नियंत्रण आलेले पाहायला मिळू शकते. टिकटॉकमुळे चर्चेत आलेल्या राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावरून ट्रम्प यांच्या प्रशासनाचे समाधान करण्यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये हा करार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

धक्कादायक! पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपती,सरन्यायाधीश, विरोधी पक्षनेते, राज्यांचे...

खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी अमेरिकेमध्ये या टिकटॉक ॲपची विक्री केली जावी किंवा ते बंद केले जावे असे मत मांडले होते. दरम्यान ओरॅकल आणि टिकटॉक यांच्यात नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर भागीदारी करण्यात आली त्याचा तांत्रिक तपशील अद्याप उघड झालेला नाही. मायक्रोसॉफ्ट या कंपनीने आपण बाईटडान्सकडून अमेरिकेतील टिकटॉकचा व्यवसाय खरेदी करणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर या दोन कंपन्यांमध्ये झालेल्या कराराचा भंडाफोड झाला आहे. दरम्यान बाईटडान्सकडून या करारावर कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. टिकटॉक आणि ओरॅकलने देखील याबाबत मौन बाळगले आहे.

शेवटी ओरॅकलच भारी

टिकटॉक हे ॲप खरेदी करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि ओरॅकल या दोन कंपन्यांमध्ये मोठी शर्यत होती. ओरॅकल या कंपनीचे डेटाबेस तंत्रज्ञानाची विक्री आणि क्लाउड सिस्टिम या व्यवसायावर प्रभुत्व आहे. अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये ओरॅकलने मायक्रोसॉफ्टवर मात केल्याचे बोलले जाते.

इस्त्राईलमध्ये तीन आठवड्यांचा लॉकडाऊन; पंतप्रधानांनी केली घोषणा

‘आर्म’ आता ‘एनव्हीआयडीआयएक’डे

आतापर्यंत सॉफ्ट बँकेच्या ताब्यात असलेली चिपनिर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी आर्म (एआरएम) एनव्हीआयडीआयए या कंपनीने तब्बल ४० अब्ज डॉलर्सला खरेदी केली आहे. ही कंपनी एनव्हीआयडीआयएची उपकंपनी म्हणून करणार असून तिचे मुख्यालय मात्र ब्रिटनमध्येच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन्ही कंपन्यांमध्ये देवाणघेवाणीबाबत हा करार झाला असला तरीसुद्धा अद्याप त्याची पडताळणी होणे बाकी आहे. सॉफ्ट बँकेने २०१६ मध्ये ३१ अब्ज डॉलरला आर्मची खरेदी केली होती, त्यानंतर या कंपनीची किंमत वेगाने वाढत गेली होती. सध्या मायक्रोसॉफ्ट देखील आर्मबेस्ड सरफेसच्या निर्मितीवर भर देत असून अॅपलच्या मॅक प्रणालीमध्ये भविष्यात आर्म्सच्या चिप दिसतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Oracle Picked as Winning Bid for TikTok in america