ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजाचा खात्मा; अमेरिकेचा दावा

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

संयुक्त राष्ट्रांनाही हमजाचे नाव जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत टाकले होते. संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेच्या दबावामुळे संयुक्त अरब अमिरातीने हमजाचे नागरिकत्व रद्द केले होते. हमजाच्या ठिकाणांचा शोध घेण्यासाठी अमेरिकन सैन्याकडून पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि ईराणमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले होते.

न्यूयॉर्क : अल् कायदा या दहशतवादी संघटनेचा माजी प्रमुख ओसामा बिन लादेन याचा मुलगा हमजा बिन लादेन याचा खात्मा करण्यात यश आल्याचा दावा अमेरिकेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी केला आहे.

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन यंत्रणांना मिळालेल्या गुप्तचर माहितीच्या आधारे हमजा ठार झाल्याचे निश्चित आहे. अमेरिकेने याच वर्षी मार्चमध्ये हमजाची माहिती देणाऱ्याला 10 लाख डॉलरचे बक्षीस जाहीर केले होते. ओसामाचा बदला घेण्यासाठी हमजा अमेरिकेवर हल्ला करण्याची तयारी करत असल्यामुळे त्याच्याविरोधात मोठे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

संयुक्त राष्ट्रांनाही हमजाचे नाव जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत टाकले होते. संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेच्या दबावामुळे संयुक्त अरब अमिरातीने हमजाचे नागरिकत्व रद्द केले होते. हमजाच्या ठिकाणांचा शोध घेण्यासाठी अमेरिकन सैन्याकडून पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि ईराणमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले होते. पाकिस्तानमधील एबोटाबाद येथे ओसामाला मारलेल्या ठिकाणी त्याच्यासोबत राहणाऱ्या खैरिया सबार या पत्नीचा तो मुलगा आहे. अमेरिकेने तेव्हा केलेल्या हल्ल्यातून तो वाचला होता.  त्यावेळी त्याचे वय 30 होते. हमजाचे लग्न मोहम्मद अता याच्या मुलीशी झाले होते. मोहम्मदने 9/11 च्या हल्ल्यावेळी विमानांची सोय केली होती. त्या विमानांद्वारे वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला करण्यात आला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osama bin Ladens son Hamza is dead says US agencies