जाधव यांना फाशी न्यायानेच: पाक माध्यमे

वृत्तसंस्था
सोमवार, 10 एप्रिल 2017

आता भारतातील नरेंद्र मोदी सरकारकडून जाधव यांना फाशी देण्यात आल्याच्या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्‍त करण्यात येईल. पाकिस्तानने यासाठी तयार रहावयास हवे

रावळपिंडी - हेरगिरीचा आरोप असलेल्या कुलभूषण जाधव या भारतीय नागरिकास फाशी देण्याची घोषणा पाकिस्तानकडून करण्यात आल्यानंतर या घटनेचे पडसाद वेगाने उमटू लागले आहेत. पाकिस्तानी माध्यमांनी जाधव यांना फाशी देण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

जाधव यांना फाशी देण्याचा निर्णय "दुर्मिळ' असल्याचे मत डॉन या पाकमधील प्रभावी वृत्तपत्राने व्यक्‍त केले आहे. पाकमधील संरक्षण तज्ज्ञांचा हवाला देत डॉनने जाधव यांना झालेली फाशी ही "अभूतपूर्व' असल्याचे म्हटले आहे. भारत व इतर देशांच्या गुप्तचर संस्थांनाही जाधव यांना झालेल्या फाशीमुळे कठोर संदेश दिला गेल्याचे मत डॉनच्या माध्यमामधून व्यक्‍त करण्यात आले आहे.

याचबरोबर, भारत व पाकिस्तानमधील वातावरण तणावग्रस्त असल्याच्या पार्श्‍वभूमीवर जाधव यांना फाशी देण्याचा निर्णय अत्यंत संवेदनशील असल्याचे डॉनने प्रतिपादन केले आहे.

"दी नेशन' या पाकमधील अन्य महत्त्वपूर्ण वर्तमानपत्रानेही जाधव यांना देण्यात आलेल्या फाशीमुळे "न्याय' झाल्याचे म्हटले आहे. या वर्तमानपत्राचे मुख्य संपादक सलीम बुखारी यांनी "पाकिस्तानविरोधी कृत्य करत असलेल्या कोणत्याही हेरास अशाच स्वरुपाची शिक्षा द्यावयास हवी,' असे मत व्यक्‍त केले आहे. नेशनने तलत मसूद या संरक्षण तज्ज्ञांचा हवाला देत "आता भारतातील नरेंद्र मोदी सरकारकडून जाधव यांना फाशी देण्यात आल्याच्या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्‍त करण्यात येईल. पाकिस्तानने यासाठी तयार रहावयास हवे,' असे स्पष्ट केले आहे.

"भारतीय रॉ एजंट कुलभूषण जाधव उर्फ हुसेन मुबारक पटेल यांना पाकिस्तानी सैन्यातर्फे राबविण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत बलुचिस्तानमधून अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी सैन्य कायद्यांतर्गत जाधव यांच्याविरोधात खटला चालविण्यात आला. जाधव यांना फाशीची शिक्षा सुनाविण्यात आली असून सैन्यप्रमुख जनरल कमर जावेद बाज्वा यांनी या शिक्षेस मान्यता दर्शविली आहे. जाधव यांनी पाकिस्तानमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासह देशाविरुद्ध युद्ध पुकारण्याचा प्रयत्न केल्याची कबुलीही दिली आहे,'' असे पाकिस्तानी सैन्यातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

Web Title: Pak Media hails death sentence to Jadhav